काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केल्यानंतर त्यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या कृतीविरोधात भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि भाजपाच्या इतर महिला सदस्यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणानंतर बाहेर जाताना संसदेच्या सभागृहातच फ्लाइंग किस दिल्याची चर्चा सुरू झाली. स्वतः स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात याची दखल घेत राहुल गांधींच्या या वागणुकीवर टीका केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी २१ भाजपा महिला खासदारांची स्वाक्षरी असलेले पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करत राहुल गांधी यांच्या या वर्तणुकीवर शरसंधान केले. राहुल गांधी यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी या खासदारांनी केलेली आहे.
यात खासदार करंदलाजे लिहितात की, वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेच्या सभागृहात केलेल्या वर्तणुकीविषयी तुमचे लक्ष वेधू इच्छिते. स्मृती इराणी भाषण करत असताना त्यांच्यादिशेने राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. या वागणुकीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. महिलांच्या प्रतिष्ठेचा हा अपमानच नाही तर या सभागृहाचाही हा अवमान आहे.
हे ही वाचा:
फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे निधन
चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा
धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही
खासदारकी मिळाल्यानंतर प्रथमच राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण केले. मणिपूरच्या विषयावर ते सविस्तर बोलतील अशी अपेक्षा असताना मणिपूरमध्ये झालेल्य़ा घटनेमुळे भारतमातेची हत्या झाली आहे, असे विधान करून नंतर ते निघून गेले. ते जात असतानाच त्यांनी सभागृहाकडे पाहात फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला गेला. त्यांची ही कृती कॅमेऱ्यात पकडली गेलेली नाही. पण ती कृती बघितल्याचा दावा करत महिला खासदारांनी हे पत्र लिहिले आणि या कृत्याचा निषेध केला. राहुल गांधी सभागृहातून जात असताना त्यांच्या हातातून फाइल पडली तेव्हा काही भाजपा खासदार हसले. तेव्हा राहुल गांधी यांनी सभागृहाकडे पाहात फ्लाइंग किस दिल्याचा दावा केला गेला.