भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत सनराईज कोविड हॉस्पिटल देखील होरपळून निघाले होते. या आगीत ११ लोकांचा नाहक बळी गेला. या प्रकरणात आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शाम शिंदे यांनी सांगितले की, रुग्णालय व्यवस्थापन आणि संचालकांविरूद्ध कलम ३०४ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
क्रिकेटच्या देवालाही कोरोनाची लागण
औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)
राज्यात विविध ठिकाणी अग्नितांडव
काल भांडुपच्या ड्रीम मॉलला आग लागली. सुमारे २० तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ रुग्णांचा मृत्यु अस्पिक्सिआने झाला तर दोघांचा मृत्यु आधीच झाला. रुग्णालयातून ७८ रुग्णांना नजीकच्याच एका रुग्णालयात हलवण्यात आले होते.
मे २०२० मध्ये कोरोना कहर वाढायला लागल्यानंतर सनराईज हॉस्पिटल चालू करण्यात आले होते. त्यासाठी विशेष अधिकारात या मॉलला ओसी देण्यात आली होती. या आगीनंतर हे हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आपात्कालिन विभागाच्या डेप्युटी कमिशनर प्रभात रहंगदाळे यांना या प्रकरणात चौकशी करायला सांगितले आहे. येत्या १५ दिवसात या प्रकरणाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.