ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होतं. या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “कानावर आलं आहे काँग्रेस फोडणार आहेत. मग आणखी एक उपमुख्यमंत्री करावा लागेल. फडणवीस मग मस्टर मंत्री राहणार का?” उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहे की, भाजपामध्ये राम उरला नाही. सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आणि आता प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर ठाकरे सरकारने राज्यभर गुन्हे दाखल केले होते. बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकाने मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला, असा निशाणा बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर लावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले आहे. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच ठाकरेंना घरी बसावं लागलं, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?
चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले
नेमाडेंचा अजब इतिहास; औरंगजेबाच्या राण्यांना हिंदूंनी भ्रष्ट केले म्हणून काशीविश्वेश्वरावर हल्ला
अजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !
औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपाला निवडून देईल. तोवर ठाकरेंनी औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसावे कारण लोकांनी सध्या तेवढंच काम दिलं आहे, असा खोचक सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.