ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या माहितीपटात काम करणाऱ्या बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याने दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचे आरोप केला आहे.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याने म्हटलंय की, या माहितीपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकी गोन्साल्विस या त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत होत्या. मात्र, या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांचे वागणे बदललं असून कार्तिकी अंतर राखून वागू लागल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
बेलीने आरोप केला आहे की, “तिच्या नातवाच्या शिक्षणासाठी वाचवलेले पैसे तिला लग्नाच्या सीनसाठी खर्च करावे लागले. लग्नाचा सीन एका दिवसात शूट करायचा होता मात्र, तिच्याकडे त्यासाठी पैसे नसल्याने आम्हाला व्यवस्था करण्यास सांगितलं. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. कार्तिकीने आम्हाला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पैसे अद्याप दिलेले नाहीत. जेव्हा आम्ही तिला कॉल करतो तेव्हा ती व्यस्त असल्याचे सांगून नंतर फोन करेन असं म्हणते पण फोन करतच नाही,” असा आरोप दोघांनी केला आहे.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोमन आणि बेली यांनी दोन कोटी रुपये ,मागितले असून निर्मात्यांनी त्यांना घर, गाडी आणि पुरेशी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप काहीही न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून जी काही आर्थिक मदत मिळाली ती निर्मात्यांनी स्वतःकडे ठेवली, असाही दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले
नेमाडेंचा अजब इतिहास; औरंगजेबाच्या राण्यांना हिंदूंनी भ्रष्ट केले म्हणून काशीविश्वेश्वरावर हल्ला
अजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !
राहुलना पुन्हा खासदारकी मिळण्याबद्दल काँग्रेसमध्ये चिंता!
चित्रपट निर्मात्यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ तयार करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट हे हत्तींच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हे होते. मात्र, त्यांनी बोमन आणि बेली यांच्या आरोपांवर कुठलेही भाष्य केलेले नाही.