कोविड महामारीच्या काळात झालेल्या बॉडी बॅग आणि कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजीत पाटकर याला अटक झालेली आहे. युवासेनेच्या सुरज चव्हाण याचीही चौकशी झालेली आहे. कोविड काळात ओरपलेला मलिदा आता अंगावर फूटू लागलाय.
कोविड काळात जनता ऑक्सिजन अभावी मरत होती. महापालिका आणि राज्यातील सत्ताधारी मात्र दोन्ही हातांनी मलिदा ओरपत होते. राज्य सरकारने याप्रकरणी कारवाईला सुरूवात केलेली आहे. भ्रष्टाचारप्रकरणी दणके द्यायला सुरूवात केलेली आहे. कारवाई होतेय हे उत्तम, परंतु याप्रकरणात फक्त मोहरे गजाआड जाणार की म्होरक्यांनाही अटक होणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
महापालिकेतील घोटाळा कसा केला जातो हे उघड गुपित आहे. स्थायी समिती हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे कुरण आहे. टक्केवारी दिल्याशिवाय इथे काहीही होत नाही. प्रत्येक पातळीवर पैसे फेकल्याशिवाय कंत्राटं मिळत नाहीत. इथे एक संपूर्ण इको सिस्टीम काम करते. फक्त महापौर, स्थायी समिती आणि अन्य समित्यांचे अध्यक्ष, सदस्य हेच फक्त पैसे खातात असे नाही. ही पदं ज्यांच्या कृपेमुळे मिळतात, त्यांच्याकडे यातला खूप मोठा हिस्सा पोहोचवावा लागतो. मुंबई महापालिका गेली २५ वर्षे शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे परिवाराच्या ताब्यात आहे. या भ्रष्टाचाराचे पितृत्व त्यांच्याचकडे आहे.
भ्रष्टाचार फक्त कोविड महामारीत झालेला नाही. त्या आधीही लूट सुरू होतीच. घनकचरा, नालेसफाई, रस्ते यापैकी काही काही सोडले नाही. पावसाळ्याआधी नाले साफ झाले नाही, तरी महापालिकेची तिजोरी मात्र नित्यनियमाने साफ होते. दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातही भ्रष्टाचार बोकाळला आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप, बूट देताना सुद्धा टक्केवारीचा मोह सुटलेला नाही.
कोविडच्या काळात ही लूट लोकांच्या नजरेत आली, कारण सर्वसामान्य मुंबईकराला चटके बसले. ऑक्सिजन अभावी, औषधांअभावी लोक तडफडून मेले. त्यात अगदी ३० ते ४० वयोगटातील तरुणांचाही समावेश होता. मृतांनाही सोडले नाही. दोन हजार रुपयांच्या बॉडी बॅग ६ हजार ८०० रुपयांना विकत घेण्यात आल्या. बोगस कंपन्या स्थापन करून कोविड सेंटरची कामे घेतली. जिथे अनेक डॉक्टर, परिचारिका फक्त कागदावर होत्या. बोगस नावे दाखवून त्यांच्या नावाने पैसे लाटण्यात आले.
महापौर पेडणेकरबाई एक दिवस परिचारिकेच्या संपूर्ण गणवेशात हॉस्पिटलमध्ये सेवा देऊन गेल्या. बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवली, पुन्हा नोटा छापण्याच्या मागे लागल्या. कोविडच्या काळात मुंबईत मृत्यूचे थैमान सुरू असताना याच महापौर बाईंनी चिरंजीवांचा शाही विवाह सोहळा आटोपून घेतला. कोट्यवधी रुपयांची उधळण केली. कुठून आला हा पैसा? अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या शाही विवाहाला दीड हजारावर लोक उपस्थित होते. कॉम्प्लेक्स परिसरात शाही व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेचे कर्मचारी सोहळ्यासाठी फुकट राबत होते. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात कलम ४२०, १२० ब, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता तपासाला गती येईल.
महापालिकेत घोटाळे करून जो काही मलिदा मिळतो त्याचा मोठा हिस्सा वर पोहोचवल्याशिवाय पदावर राहता येत नाही. हा हिस्सा सुमारे ६० टक्के असतो. याच हिश्शातून फक्त मुंबईत आठ मजली इमारत उभा राहीलेली नाही. लंडन, दुबई, सिंगापूरमध्ये कोट्यवधीच्या मालमत्ता उभ्या राहिल्या आहेत. तुर्तास पोलिसांच्या जाळ्यात आलेले छोटे मासेही नाहीत, फक्त माशा आहेत. मुंबई महापालिकेतून मिळालेल्या टक्केवारीवर पोसलेल्या शार्कवर जाळे टाकले जाणार आहे काय? हा कळीचा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भ्रष्टाचार खणून काढण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, ईडी, आयकर विभाग अशा अनेक तपास यंत्रणा हा भ्रष्टाचार खणून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
युवासेनेचा पदाधिकारी सुरज चव्हाण याच्या चेंबूर येथील घरावर धाड घालून ईडीने सलग १७ तास चौकशी केली. या कारवाईनंतर आदित्य ठाकरे लगेच चव्हाण यांना भेटले होते. संजय राऊतांचा खास मित्र असलेल्या सुजीत पाटकरला अटक झालेली आहे. आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, चौकशीचा हा फेरा संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? त्यांनी या भ्रष्टाचाराच्या मलिद्यातून उभारलेल्या साम्राज्यावर टाच येणार आहे का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.
हे ही वाचा:
अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात
…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला
मविआची सत्ता असताना एपीआय सचिन वाजे याने धुमाकूळ घातला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तो थेट बोलायचा, त्यामुळे अनेक आयपीएस त्याला वचकून असायचे. वाजे त्यांना आदेश द्यायचा. ‘वाजे हा लादेन नाही’, अशी वकीली करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याला हे बळ दिले होते. मुख्यमंत्र्याने खरे तर पोलिस आय़ुक्त दर्जाच्या अधिकाऱ्या पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याशी बोलू नये असे संकेत आहेत. तरीही ठाकरेंनी एका सामान्य एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला, एका सामान्य मोहऱ्याला डोक्यावर चढवून ठेवले होते त्याचे एकमेव कारण फायदा हेच होते.
किशोरी पेडणेकर, सुजीत पाटकर हे देखील मोहरेच आहेत. महापालिकेतील वाजे आहेत. महापालिकेतील हा घोटाळा देशात आजवर झालेल्या घोटाळ्यांचा बाप आहे. त्याच्या पुढे टू-जी आणि कोलगेट हे घोटाळे सुद्धा चिरीमिरी आहेत, असा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला होता. सत्ताधारी पक्षाच्या अशा अनेक नेत्यांनी याबाबत आवाज उठवला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या कळसापर्यंत कारवाई पुढे सरकायला हवी. कोविड घोटाळ्याचे राजकारण होऊ नये, अशी जनतेची इच्छा आहे. शह आणि मात ऐवजी शह, सेटींग आणि माफ या मार्गाने ही कारवाई जाऊ नये.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)