माफिया अतिक अहमद टोळीचा सहकारी इरफान हसन याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. धूमनगंज पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. हसन याचे सहकारी फरार आहेत.
इरफान हा कोशंबीमधील सैलाबी गावाचा रहिवासी असून माफिया अतिक अहमद याचा नातेवाईक आहे. पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली कारवाई करत या घटनेत वापरण्यात आलेली क्रेटा कारही जप्त केली आहे. तसेच या प्रकरणात खालिद जफर बरोबरचे बाकीचे आरोपी फरार आहेत. खालिद जफर, त्याचा भाऊ माज आणि इरफानवर ५० लाखांची खंडणी आणि धमकी देण्याचा आरोप करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये २४ फेब्रुवारी रोजी वकील उमेश पाल याची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याला पोलिसांनी एनकाऊंटर करत कंठस्नान घातले होते. उर्वरित तीन आरोपींचा देखील एनकाऊंटर करण्यात आला. मात्र, या घटनेत विस्फोटकांचा वापर करणारा गुड्डू मुस्लिम अद्याप फरार आहे. तसेचं अतिक अहमदची बायको शायस्ता परवीन देखील फरार आहे.
हे ही वाचा:
…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला
गुड्डू मुस्लिम हा सध्या कुठे आहे याचे उत्तर अद्याप ना प्रयागराज पोलिसांकडे आहे, ना उमेश पाल हत्या प्रकरणाची चौकशी करण्याऱ्या विशेष तपास दलाकडे आहे. उत्तर प्रदेश एसटीएफकडून अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून त्याचा कुठेही पत्ता लागलेला नाही. दरम्यान, गुड्डू मुस्लिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, मुंबई, नागपुरमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, अद्याप या बातम्यांना दुजोरा मिळालेला नाही.