पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाकटी बहीण बसंती बेन या त्यांचे पती आणि नातेवाइकांसह ऋषिकेश या तीर्थस्थळी आल्या होत्या. तेथील पौडी गढवाल येथील मंदिरातून परत येत असताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी यांच्या दुकानात जाऊन त्यांची भेट घेतली. ही एकदम अनौपचारिक भेट होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण आणि त्यांचे नातेवाईक गुजरातमध्ये राहतात. येथे देवदर्शनासाठी आलेले हे सर्वजण दयानंद आश्रमात थांबले होते, असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका सूत्राने सांगितले. पती हंसमुख आणि काही नातेवाइकांसह बसंती बेन यांनी दोन किमी पायी चालून कोठारजवळील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिराला भेट दिली. परत येताना त्या शशीदेवींच्या दुकानात उतरल्या. एका छायाचित्रात दोन्ही बहिणी एकमेकांना भेटताना आणि मिठी मारताना दिसत आहेत. देशातील दोन शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्यांच्या बहिणींनी काही वेळ एकत्र घालवला. पंतप्रधान मोदींच्या बहिणीने शशी देवी यांच्या नम्र वागणुकीचे आणि साध्यासरळ जीवनशैलीचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि आदित्यनाथ यांचे नातेवाईक सहसा प्रसिद्धीपासून दूर राहतात.
हे ही वाचा:
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला
छ. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल
शशी देवी कोठार गावात राहतात आणि ‘माँ भुवनेश्वरी प्रसाद भंडार’ नावाचे दुकान चालवतात. या दुकानात पूजेसाठी वापरल्या जाणार्या इतर वस्तूंसह घंटा, सिंदूरचीही विक्री केली जाते. तर, त्यांचे पती ‘जय श्री गुरु गोरक्षनाथ जी’ नावाने चहाचे छोटेसे दुकान चालवतात. आदित्यनाथ हे गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे महंत (प्रमुख) आहेत. मुख्यमंत्री योगी हे उत्तराखंडचे आहेत आणि त्यांची आई आणि भाऊ पौरी जिल्ह्यातील पंचूर गावात राहतात. मागच्या वर्षी आदित्यनाथ यांनी त्यांच्या आईला भेट दिली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतल्याबद्दल सांगितले होते आणि त्यांच्या बहिणीबद्दलही बोलले होते.