कुनो अभयारण्यात चित्त्यांचे मृत्यू होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाला सादर झाले आहे. या पत्रात दोन परदेशी तज्ज्ञांसह चार तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केल्याचे नमूद केले आहे. मात्र यापैकी दोन तज्ज्ञांनी आपण सर्वोच्च न्यायालयाला पत्र देण्यास कधीही संमती दिली नाही, असे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात दोन परदेशी तज्ज्ञ, व्हिन्सेंट व्हॅन डी मर्वे आणि डॉ. अँडी फ्रेझर यांच्या नावांचा उल्लेख आहे. मात्र या दोघांनी या पत्राला आपण कधीही संमती दिली नाही असे सांगून ते मागे घेण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीला ईमेल लिहून हे पत्र त्यांच्या संमतीशिवाय पाठवण्यात आले आहे. अलीकडील प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची नावे आल्यावर त्यांना आश्चर्य वाटले, असे लिहिले आहे.
चित्ता प्रकल्पाच्या सुकाणू समितीचा भाग असलेल्या चार दक्षिण आफ्रिकन आणि नामिबियातील तज्ज्ञांनी या प्रकल्पाचे व्यवस्थापन कसे केले जात आहे, याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता.
ईमेलमध्ये काय म्हटले आहे?
हा ईमेल व्हिन्सेंट व्हॅन यांनी पाठवला आहे. ‘आम्हाला कळले आहे की एक पत्र फिरत आहे, जे प्रोजेक्ट चीताबद्दल आम्हाला वाटत असलेल्या चिंता आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे व्यक्त करत आहोत, असे त्यात नमूद केले आहे. परंतु कृपया हे जाणून घ्या की डॉ. अँडी फ्रेझियर आणि मी हे पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात संमती दिलेली नाही,’ असे या ईमेलमध्ये लिहिले आहे. तसेच, त्यांनी विनंती केली आहे की हे पत्र प्रसारमाध्यमे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे देऊ नये आणि ते मागे घ्यावे. तसेच, शक्य नसेल तर त्यांची नावे पत्रातून काढून टाकण्याची विनंती त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते, सभापतींची घोषणा
औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेत नितेश राणे विरुद्ध अबू आझमी
‘जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबाराची घटना बघून आली कसाबची आठवण’
भारतात आणलेल्या चित्त्यांच्या अलीकडील मृत्यूचा संदर्भ देत, तज्ज्ञांनी म्हटले आहे की अलीकडील चित्तामृत्यू दुर्दैवी असले तरी, त्यांनी या पत्रामुळे प्रसारमाध्यमांमध्ये वादाला नवे तोंड फुटेल. चित्ता प्रकल्पासाठी ही नकारात्मकता धोकादायक असेल. याचा कुनो अभयारण्याच्या कर्मचार्यांवर ताण वाढेल, त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल. त्याचा परिणाम, आफ्रिकेतील चित्त्यांच्या पुढील वाढीवर होईल, अशी भीतीही या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
केंद्राने काय म्हटले आहे?
पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने या पत्राचा संदर्भही देऊन सर्वोच्च न्यायालयाला दोन तज्ज्ञांनी कागदपत्रांत केलेल्या आरोपांचे खंडन केल्याचे नमूद केले. तसेच, त्यांच्या नावाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्राने असेही म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांच्या सूचना असलेल्या दस्तऐवजात चार वेगवेगळ्या चीता तज्ज्ञांची नावे असली त्यावर फक्त एका सदस्याने स्वाक्षरी केली आहे.
नवव्या चित्त्याचा मृत्यू
मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यामध्ये बुधवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. हा मार्चपासूनचा नववा मृत्यू आहे. चित्ता प्रकल्पांतर्गत, सप्टेंबर २०२२मध्ये दोन गटांमधून एकूण २० चित्ते नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुनो अभयारण्यात आयात करण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२३पासून सहा प्रौढ चित्ते विविध कारणांमुळे मरण पावले आहेत. मे महिन्यात नामिबियाच्या मादीच्या चित्त्यापासून जन्मलेल्या चार शावकांपैकी तीन पिल्लेही अतिउष्म्यामुळे मरण पावली होती.