काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर सभागृहात सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांच्या हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवलं.
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि सरकारला पाठींबा दिल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनाम दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसची आमदार संख्या असल्याने काँग्रेसकडून या पदावर दावा करण्यात आला होता. हे पद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे परत आले आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे चर्चेत होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विजय वड्डेटीवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत. विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना सुरुवातीला करायला हवं होतं पण आता शेवटच्या काळात त्यांना पद मिळालं आहे. २०२४ साली पुन्हा आम्ही सत्तेत येणार आहोत. त्यावेळी देखील तुम्ही विरोधी पक्षनेते व्हाल, अशा मिश्कील शुभेच्छा त्यांनी दिल्या.
हे ही वाचा:
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा
पुण्यातून पावणेदोन कोटी रुपये किंमतीचे अफीम जप्त
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले आहेत. शासन चुकलं की त्यांना त्यांची चूक दाखवून देणं हे विरोधी पक्ष नेत्याच काम असतं. या महत्त्वाच्या पदावर दुसऱ्यांदा वडेट्टीवार बसले आहेत. त्या पदाचा मान सन्मान ते वाढवतील.