पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. लोहगाव आणि हडपसर परिसरात छापे टाकून अफीम जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी राजस्थान येथील दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक- २ ने ही मोठी कारवाई केली आहे.
लोहगाव आणि हडपसर परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने पावणेदोन कोटी रुपये किंमतीचे अफीम जप्त केले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव परिसरात राहुलकुमार भुरालालजी साहू (वय ३२, रा. मंगलवाडा, राजस्थान) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच किलो ५१९ ग्रॅम अफीम जप्त केले आहे. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर येथील फुरसुंगी परिसरात सापळा रचून पोलिसांनी मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय २४, रा. बगरापूर मारवाडी, राजस्थान) याला अटक केली. त्याच्याकडून ६० लाख रुपये किंमतीचे तीन किलो २९ ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले आहे. तसेच, येरवडा परिसरातून सोनू साहेबराव कोळसे (वय ४४, रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) याच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त केला आहे.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
मुंबईत २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.