१२ ऑगस्ट रोजी होणार्या बहुप्रतीक्षित कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निष्ठावंत आणि सरकारच्या पाठिंब्याने उभे राहिलेले उमेदवार यांच्यात लढत रंगणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.
निवड झालेले १५ सदस्य सन २०२३ ते २६ या कालावधीसाठी कुस्ती महासंघाची जबाबदारी सांभाळतील. या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी आणि जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे न्या. महेश मित्तल कुमार यांनी ३२ अर्ज स्वीकारले आहेत. यातील अनेकांनी एकाहून अनेक पदांसाठी अर्ज केले आहेत.
अध्यक्षपदासाठी बृजभूषण सिंह आणि सरकारच्या पाठिंब्याचे असे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये बृजभूषण यांचे जवळचे सहकारी उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष संजय सिंह आणि दिल्लीच्या कुस्ती महासंघाचे प्रमुख ऑलिम्पिकपटू जय प्रकाश यांचा समावेश आहे. तर, अन्य दोघांमध्ये जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दुष्यंत शर्मा आणि सन २०१०च्या दिल्ली राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती अनिता शेवरण यांचा समावेश आहे. शेवरण या ५० सदस्य मतदारांपैकी एकमेव महिला उमेदवार आहेत आणि बृजभूषण यांच्या विरोधात सहा महिला कुस्तीगीरांनी केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारही आहेत. त्या हरयाणातील असून तेथील राज्याच्या पोलिस खात्यात असल्या तरी त्या ओदिशा सरकारच्या प्रतिनिधी म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
हे ही वाचा:
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर
गलवानमध्ये वडील गमावले; पण १४ वर्षीय प्रसन्नाला हॉकीने सावरले!
विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
पुणे दहशतवादी प्रकरणात पाचव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
रेल्वेच्या क्रीडा प्रोत्साहन मंडळाचे प्रेमचंद लोचब यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांनी सेक्रेटरीपदासाठी अर्ज केला आहे. याच पदासाठी चंडिगढ युनिटमधून दर्शन लाल आणि जय प्रकाश उभे राहिले आहेत. ५ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत कोण अर्ज मागे घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उमेदवारांची अंतिम यादी ७ ऑगस्टला जाहीर केली जाईल.
बृजभूषण सिंह यांच्या गटाने २५पैकी २० जणांची मते मिळतील, असा दावा केला आहे. तर, सरकार आणि बृजभूषण सिंह यांचा गट मिळून कुस्ती महासंघाची पदे विभागून घेतील, असा दावाही केला जात आहे.
उमेदवारांची यादी
अध्यक्ष
संजयकुमार सिंह, जय प्रकाश, दुष्यंत शर्मा, अनिता शेवरण
उपाध्यक्ष
असित कुमार साहा, आयडी नानावटी, देवेंदर
उपाध्यक्ष
हमझा-बिन-ओमर, करतार सिंग, एन. फोनी, असित कुमार साहा, जय प्रकाश, मोहन यादव
सरचिटणीस
दर्शन लाल, जयप्रकाश, प्रेमचंद लोचब
खजिनदार
सत्यपाल सिंग देशवाल, दुष्यंत शर्मा
जॉइंट सेक्रेटरी
आरके पुरुषोत्तम, रोहताश सिंग, बेल्लीप्पॅडी गुणराजन शेट्टी, कुलदीप सिंग
कार्यकारिणी सदस्य
एम लोगानाथन, नीवीकुओली खातसील, राकेश सिंह, उम्मेद सिंग, प्रशांत राय, रजनीश कुमार, जे. श्रीनीवास., रतुल शर्मा, अजय वैद, कुलदीप सिंग