भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात येत आहेत. टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यामुळे भाजपाविरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुणे येथील एसपी कॉलेज मैदानात मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पण त्या कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते, उद्धव ठाकरे गट यांच्याकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे. शरद पवार मात्र या कार्यक्रमाला जाण्यासाठी ठाम आहेत. मात्र त्यांच्या गटातील कार्यकर्ते पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार आहेत. त्यामुळे एकीकडे पवार या कार्यक्रमात सहभागी होत असताना त्यांचे कार्यकर्ते मात्र विरोधाच्या पवित्र्यात असतील.
इंडिया या नावाने विरोधकांची एकजूट सध्या देशात झालेली आहे. त्यांच्या या गटाचे एक प्रमुख सदस्य स्वतः शरद पवार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला खाली खेचण्याचा हेतू समोर ठेवून हा गट तयार झाला आहे. असे असताना शरद पवार मोदींच्या कार्यक्रमाला जात असल्यामुळे काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मुख्य म्हणजे शरद पवार यांनीच नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. टिळकांच्या कुटुंबियांकडून पवारांना यासाठी गळ घातली गेली होती. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे की, अजित पवार वेगळे होण्यापूर्वीच पंतप्रधानांना शरद पवारांनी आमंत्रित केलेले आहे. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या निर्णयातील अनिश्चिततेमुळे या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामागे नेमके कोणते राजकारण शिजत आहे, याचा तपास घेतला जात आहे.
हे ही वाचा:
…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण
नोकरी जमीन घोटाळा प्रकरणात लालूंची ६ कोटींची मालमत्ता जप्त !
वनडे वर्ल्डकपची भारत-पाकिस्तान झुंज १४ ऑक्टोबरला
संजय राऊत यांनी यासंदर्भात पवारांच्या या उपस्थितीवर शंका घेतली आहे. शरद पवार जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर त्यामुळे लोकांच्या मनात भ्रम निर्माण होईल. पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. त्यामुळे इंडियाच्या एकजुटीला तडा जाऊ शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्कार सोहळ्याआधी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. अनेक विकास कामांचे उद्घाटन किंवा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहेत.
टिळक स्मारकाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्यांनी देशाच्या विकासात योगदान दिले अशा व्यक्तींचा गौरव या पुरस्काराने केला जातो. मोदी हे हा पुरस्कार प्राप्त करणारे ४१ वे सन्मानार्थी असतील.