पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून १८ जुलै रोजी दोन जणांना अटक केली होती. तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडील (एनआयए) गुन्ह्यात फरारी असल्याचे आणि त्यांच्याविरुध्द प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली होती. तसेच हे दोघे दहशतवादी असल्याचे समोर आले. दरम्यान, आता हे दहशतवादी राहत असलेल्या घरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एटीएसच्या पथकाला या दहशतवाद्यांच्या घरातून एक कागद सापडला आहे. घरातील पंख्याच्या पाईपमध्ये हा कागद लपवून ठेवला होता. या कागदावर बॉम्ब बनवण्याची माहिती असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोंढवा येथे हे दोघे दहशतवादी राहत होते. त्या घरात एटीएसकडून तपासणी करण्यात आली. तेव्हा पंख्याच्या पाईपमध्ये बॉम्ब बनवण्याची सर्व माहिती हाताने लिहिलेला कागद सापडला. तसेच यासोबतच अॅल्युमिनीयमचे पाईप, काच आणि बुलेट्स देखील घरातील सिलींगमध्ये सापडल्या आहेत.
पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरत असताना पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड होते. तसेच ‘एनआयए’ने यांना पकडण्यासाठी पाच लाखांचे बक्षिस घोषित केले होते. पुढे त्यांची चौकशी केली असता ते दहशतवादी संघटनेचे काम करत असल्याचे समोर आले. त्यांनी पहिल्यांदा वेगळी नावं सांगितली होती. मात्र, ट्रू कॉलरवर त्यांची नावं वेगळी आल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी पुन्हा सखोल चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरात पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब तयार करण्याची पावडरही सापडली होती.
हे ही वाचा:
स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त
युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला
शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुल साकी (वय २४) अशी दोघांची नावे आहेत. यांच्याकडून आतापर्यंत त्यांच्या कोंढवा येथील घरातून लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रॉनिक्स सोल्डरींग गन, केमिकल पावडर आणि वेगवेगळी उर्दू, अरेबिक भाषेतील पुस्तके असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.