पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडल्याने राजस्थानमधून पाकिस्तानला गेलेल्या अंजूचा सध्या तरी भारतात परतण्याचा विचार नसल्याचे दिसून येत आहे. तिने स्वत:च भारतात परतण्याबाबत शंका उपस्थित केली आहे. अंजूने तिचा प्रियकर नसरुल्लाह याच्याशी विवाह केल्याचे समजते. इथे राजस्थानच्या भिवाडी येथील तिचे वडील आणि नवऱ्यानेही तिला स्वीकारण्यास नकार दिला आहे. हल्लीच तिने तिचा एक व्हिडीओ प्रसृत केला असून, त्यात ती बुरख्यात दिसत आहे.
भारतात परत आल्यावर काय प्रतिक्रिया उमटतील, ही भीती अंजूला पोखरते आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिला भारतात सोडण्याच्या लायकीचे ठेवण्यात आलेले नाही. भारतात परतल्यावर समजा तिचा स्वीकार केला गेला नाही तर ती कुठे जाईल? ती पाकिस्तानमध्ये संपूर्ण स्वतंत्रपणे आणि सुरक्षित आयुष्य जगते आहे, असेही तिने सांगितले.
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा येथे पोहोचल्यानंतर अंजूने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. काही प्रसारमाध्यमांनुसार, तिने सुरुवातीला हे वृत्त फेटाळले होते. आता धर्मांतरानंतर तिचे नाव फातिमा झाल्याचे समजते. तिने तिचा प्रियकर नसरुल्लाह याच्याशी जिल्हा न्यायालयात विवाह केला आहे. तर, भारतातील अंजूचे पती अरविंदने घटस्फोट झाल्याशिवाय अंजू दुसरा विवाह कसा करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘अंजूने सांगितले की, तीन वर्षांपूर्वीच तिने दिल्लीत घटस्फोटाची कागदपत्रे सादर केली होती. मात्र मला न्यायालयाकडून अद्याप कोणतीही नोटीस अथवा समन्स मिळालेले नाही. कागदपत्रांनुसार, ती अद्यापही माझी पत्नी आहे आणि ती दुसरे लग्न करू शकत नाही. सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे,’ असे तिचा पती अरविंद याने सांगितले.
पाकिस्तानधील छायाचित्रे, व्हिडीओही समोर
लग्नानंतर अंजूची पाकिस्तानमधील काही छायाचित्रेही समोर आली आहेत. त्यात ती बुरख्यामध्ये दिसते आहे. अंजूची भारतात दोन मुले आहेत. ती भिवाडीमधून दिल्ली, दिल्लीतून अमृतसर आणि वाघा सीमेतून पाकिस्तानात दाखल झाली होती. तेव्हा तिने काही दिवसांतच आपण भारतात परतणार असल्याचे जाहीर केले होते.