पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) वर जोरदार टीका केली. ‘विरोधी पक्षांनी त्यांचे नाव बदलले आहे, परंतु त्यांचे चेहरे तेच असून पापे, सवयी बदललेल्या नाहीत. त्यांची कार्यपद्धती आणि हेतूही तेच आहेत, केवळ त्यांचे नाव बदलले आहे,’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली. गुरुवारी गुजरातच्या राजकोटमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
‘विरोधी पक्षाचे धोरण हे नेहमीच दुटप्पी राहिले आहे. सरकार जे काही करते, त्यावर त्यांचा आक्षेप असतो. ‘मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात वस्तू मिळाल्या, तर ते म्हणतील शेतकरी त्यांची उत्पादने योग्य भावात विकू शकत नाहीत. जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना जास्त भाव मिळतो, तेव्हा ते म्हणतात की महागाई आहे. हे दुटप्पी राजकारण आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
‘त्यांनी त्यांच्या गटाचे नाव बदलले कारण ते लोकांची स्वप्ने पूर्ण होत आहेत, या वस्तुस्थितीवर नाराज आहेत. देश पुढे जात आहे आणि काही लोकांना ते आवडत नाही. लोकांची स्वप्ने पूर्ण होत आहेत हे पाहून ते नाराज आहेत. त्यामुळेच या भ्रष्ट आणि घराणेशाही चालवणाऱ्या लोकांनी त्यांच्या गटाचे नाव बदलले आहे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आधीच्या यूपीए सरकारवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या कारकिर्दीत महागाईचा दर १० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र करोना आणि युद्ध असतानाही त्यांच्या सरकारने महागाई नियंत्रणात ठेवल्याचे ते म्हणाले. “आज आपल्या शेजारील देशांमध्ये महागाई २५-३० टक्के दराने वाढत आहे. पण भारतात तसे होत नाही. आम्ही पूर्ण संवेदनशीलतेने महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यातही असेच करत राहू’, असे पंतप्रधानांनी राजकोट येथे उपस्थित जनसमुदायाला सांगितले.
हे ही वाचा:
भारताचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट राखून विजय
इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक
विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं
महिला अत्याचाराविरोधात केंद्र सरकारचे ‘झिरो टॉलरेंस’ धोरण
विरोधी पक्षांना लक्ष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “त्यांचे सरकार असते तर दूध महाग झाले असते. आज दूध ३०० रुपये प्रति लिटर आणि डाळ ५०० रुपये किलो असती.’ पंतप्रधानांनी यापूर्वी विरोधी पक्षांच्या युतीवर टीका केली होती आणि केवळ ‘इंडिया’ शब्द वापरून चालणार नाही, असे म्हटले होते. ‘ईस्ट इंडिया कंपनीनेही इंडिया नावाचा वापर केला होता. ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेच्या नावातही ‘इंडिया’ होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.