वंदे भारतच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांचे आरामदायक आणि गतिमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असले तरी या गाड्यांवर दगडफेक करून होणाऱ्या नुकसानीचेही प्रमाण वाढताना दिसून येते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात लोकसभेत माहिती दिली. या नुकसानीचा फटका या रेल्वेला बसत असून ५५ लाखांचे नुकसान या दगडफेकीत झालेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
एका प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, दगडफेकीच्या घटनांमध्ये जवळपास १५१ लोकांना अटक करण्यात आली आहे. या घटनांमुळे ५५.६० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली
मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…
वक्फ बोर्डानंतर जमियतही म्हणते अहमदीया हे मुस्लिम नाहीत!
विद्यार्थ्यांना टिळा, गंध लावण्यास शाळेचा विरोध
वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारतमध्ये कोणाचेही सामान चोरी झाल्याच्या किंवा सामानाचे नुकसान झाल्याच्या घटना मात्र घडलेल्या नाहीत. वैष्णव यांनी सांगितले की, २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३ या कालावधीत दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यात वंदे भारत गाड्यांचे नुकसान झाले आहे. पण या घटनांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल , जिल्हा पोलिस आणि प्रशासन यांच्यावतीने ऑपरेशन साथीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
या गाड्या सुरू झाल्यापासून त्यांच्या काचांवर दगडफेक करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना कुणीतरी जाणीवपूर्वक करत असल्याचेही समोर आले आहे. पण आता त्यावर कारवाईही होत आहे. २०१९मध्ये पहिल्यांदा दिल्ली वाराणसी वंदे भारत गाडी सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत २५ वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.