मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. राज्यातील मोरेह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने सुमारे ३० रिकामी घरे आणि दुकानांना आग लावली, तसेच सुरक्षा दलावर गोळीबारही केला. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली.
मे महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे या परिसरातील घरे रिकामी झाली होती. लोक घरदार सोडून निघून गेले होते. या रिकाम्या घरांनाच जमावाने लक्ष्य केले. ही रिकामी घरे म्यानमारच्या सीमेजवळ मोरेह बाजार भागामध्ये आहेत.
जाळपोळीनंतर जमाव आणि सुरक्षा दलामध्ये गोळीबार झाला, मात्र त्यामध्ये कोणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती न मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कांगपोकपी जिल्ह्यामध्ये जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन बसना आग लावल्याचीही घटना घडली. या बस मंगळवारी संध्याकाळी दिमापूरहून परत येताना सपोरमेईना येथे जमावाने त्यांना आग लावली. स्थानिकांनी या बस थांबवल्या आणि त्यामध्ये अन्य समुदायाचे कोणी सदस्य आहेत का हे तपासण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्यातील काही जणांनी या बसना आग लावली.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
गांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री
वर्षभरात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंडशी मायदेशात भारतीय संघ करणार दोन हात
दरम्यान, मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मे महिन्यात घडला होता. याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मणिपूरमधील पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. अद्याप इतर आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.