ऍप्पल ही जगातील सर्वांत मोठी टेक कंपनी आहे, जी जगातील सर्वांत लोकप्रिय फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप बनवते. तिने आणलेल्या नवीन मोबाइल किंवा टॅब्लेटवर अनेक ग्राहक डोळे झाकून उड्या मारतात. याच कंपनीने एकदा विशेष संग्रहाचा भाग म्हणून स्नीकर्सही बनवले होते. होय, बरोबर. ही बातमी ऍप्पलचीच आहे. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ऍप्पल कंपनीने आपले नाव स्नीकर्सना दिले होते. मात्र हे स्नीकर्स कधीही सर्वसामान्यांना विकले गेले नाहीत. तथापि, उत्सुक ग्राहक हे दुर्मिळ स्नीकर्स आता मिळवू शकतात. हे शूज सोदबायद्वारे लिलावासाठी ठेवण्यात आले आहेत.
या शूजमध्ये इतके ‘विशेष’ काय आहे?
मुळात म्हणजे ते कोठेही मिळवणे हे सर्वांत कठीण आहे. हे फक्त ऍप्पल कर्मचार्यांसाठी खास बनवले गेले होते. लिलावाच्या वेबसाइटवरील या स्नीकर्सबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. ‘ऍप्पल कर्मचाऱ्यांसाठी खास बनवलेले, हे अति-दुर्मिळ स्नीकर्स ९० च्या दशकाच्या मध्यात राष्ट्रीय विक्री परिषदेत देण्यात आले होते,’ असे यात नमूद करण्यात आले आहे.
ऍप्पलने ओमेगा स्पोर्ट्सची भागिदारी केली असल्याने त्यांनी ते तांत्रिकदृष्ट्या बनवले नाहीत. तेव्हा ऍप्पल त्यांचे ‘ब्रँड नेम’ काही विशिष्ट कंपन्यांना त्यांच्या काही खास उत्पादनासाठी काही ठराविक किमतीत देत असे. हाँडा, ब्रॉन अशा काही कंपन्यांना त्यांच्या काही खास उत्पादनासाठी ऍप्पलने आपले नाव यापूर्वीही दिले आहे. या स्नीकर्सवर ऍप्पल लोगोही आहे.
यावर इंद्रधनुष्यात रंगवलेला ऍप्पलचा लोगो आहे. हे स्नीकर्स कधीही लोकांपर्यंत पोहोचले नसल्याने ती दुर्मिळातील दुर्मिळ बाब आहे आणि पुनर्विक्रीच्या बाजारपेठेत याला अत्यंत प्रतिष्ठा आहे, असेही यात म्हटले आहे.
हे ही वाचा :
मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर
‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी
ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले
ऍप्पलचे काहीही उत्पादन आले तरी लोक डोळे झाकून ते खरेदी करण्यासाठी उड्या मारतात. अलीकडेच सर्वांत पहिला आयफोन तब्बल ६३ लाख रुपयांना विकला गेला. हे लक्षात घेऊन या स्नीकर्सची किंमतही ५० हजार डॉलर (अंदाजे ४२ लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. अर्थात ही केवळ सुरुवातीची किंमत आहे आणि लोक अधिक बोली लावू शकतात.