हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगरी राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, दरड कोसळणे यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे २०० मीटर वाहून गेला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे १००० हून अधिक भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
हिमाचल प्रदेशात जूनपासून ढगफुटीच्या जवळपास ३५ घटना घडल्या आहेत. गेल्या २४ दिवसांत २७ वेळा ढगफुटी झाली. पुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६०६ घरांची पडझड झाली असून ५३६३ घरांचे नुकसान झाले आहे. यासोबतच दिल्लीत देखील पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदी अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. दिल्लीत आज, मंगळवारी सकाळी यमुनेची पाणीपातळी २०५.४५ एवढी नोंदवण्यात आली. तर हवामान विभागाने आज, मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा:
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक शिरीष कणेकर यांचे निधन
मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
इर्शाळवाडी दुर्घटनेत पोरक्या झालेल्या मुलांना हवाय भावनिक आधार
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
यासोबतच हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात मुसळधार आणि मध्यप्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.