हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट अनुक्रमे भारतीय कुस्ती संघाच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला कुस्तीगिरांचे नेतृत्व करतील. महाराष्ट्राचा मात्र एकही कुस्तीगीर यावेळीही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडला गेला नाही. यासाठी घेण्यात आलेल्या चाचणीनंतर सोनम मलिक, अमन सेहेरावत आणि दीपक पुनिया यांनीही यात स्थान मिळवले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ऑलिम्पक पदकविजेता रवी दाहिया आशियाई स्पर्धांसाठी पात्र ठरू शकला नाही. ५७ किलो वजनी गटातील निवड चाचणीत अतिश तोडकर याने दाहिया याला पहिल्याच फेरीत बाद केले. पण तोडकरला नंतर पराभव पत्करावा लागल्याने महाराष्ट्राची निराशा झाली.
राहुल आवारेने २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले होते. पण त्यालाही आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळू शकले नाही. २०१८मध्येही त्याची निवड झाली नव्हती. एकूणच महाराष्ट्राचे कुस्तीगीर आशियाई क्रीडा स्पर्धेत का खेळू शकत नाहीत, याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
कुस्तीतील ग्रेको-रोमन व महिलांच्या आणि पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील कुस्तीपटूंची निवड रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या चाचण्यांमधून करण्यात आली.
भारतीय ऑलिम्पिंक संघटनेने बजरंग पुनिया (पुरुष ६५किलो) आणि विनेश फोगट (महिला ५३ किलो) यांना निवड चाचणीतून सवलत दिली होती. त्यामुळे त्यांची आशियाई स्पर्धांसाठी थेट निवड झाली आहे. मात्र त्यांच्या श्रेणीत चाचणी होऊन त्यातील विजेत्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
ग्रीको-रोमन, पुरुषांची फ्रीस्टाइल आणि महिलांच्या फ्रीस्टाइल अशा तीन प्रकारांत प्रत्येकी सहा अशा १८ कुस्तीपटूंची निवड झाली आहे. तर, महिलांच्या ५३ किलो वजनी गटात आणि पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात अतिरिक्त दोन राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रवि दाहिया आश्चर्यकारकरीत्या अतिश तोडकर याच्याकडून चितपट झाला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची ही यंदाच्या वर्षातील पहिलीच निवड चाचणी होती.
हे ही वाचा:
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड
हिजाबशिवाय अभिनेत्रीचे पोस्टर; इराणमध्ये चित्रपट महोत्सवावरच बंदी
नागपुरातील व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ५८ कोटींचा गंडा!
आता ५७ वजनी गटात २३ वर्षांखालील जागतिक पदकविजेता अमन सेहेरावत भारताचे प्रतिनिधित्व करेल. अमनने अंतिम सामन्यात राहुलचा पराभव केला. तर, राहुलने उपांत्य सामन्यात तोडकरचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. ऑलिम्पिकविजेता दीपक पुनिया याने ८६ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात जॉन्टीचा पराभव करून स्वत:चे आशियाई स्पर्धेचे तिकीट नक्की केले. तर, ६५ किलो वजनी गटात विशाल कालिरामन याने रोहितचा पराभव केला. आता तो या श्रेणीत बजरंगचा राखीव खेळाडू असेल. यश, विकी आणि सुमित याने अनुक्रमे ७४ किलो, ९७ किलो आणि १२५ किलो वजनी गटात पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारात आपले स्थान पक्के केले.
संघ असे –
ग्रीको-रोमन
ज्ञानेंद्र – ६० किलो, नीरज – ६७ किलो, विकास – ७७ किलो, सुनील कुमार – ८७ किलो, नरिंदर चीमा – ९७ किलो, नवीन – १३० किलो
महिला फ्रीस्टाइल
पूजा गेहलोत – ५० किलो
विनेश फोगट – ५३ किलो (अंतिम पनघल राखीव खेळाडू)
मानसी अहलावत – ५७ किलो
सोनम मलिक – ६२ किलो
राधिका – ६८ किलो
किरण – ७६ किलो
पुरूषांची फ्री स्टाईल
अमन सेहरावत – ५७ किलो
बजरंग पुनिया – ६५ किलो (विशाल कालीरामन राखीव खेळाडू)
यश – ७४ किलो
दीपक पुनिया – ८६ किलो
सुमित – १२५ किलो
विकी – ९७ किलो