मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गुरुवारी उच्च नायायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर या बदलीला आव्हान देणारी याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे. तर याचाच याचिकेतून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे.
परमबीर सिंग यांनी त्यांच्या बदली विरोधात आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती. परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली होती. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली. सिंह यांच्यावतीने ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
हे ही वाचा:
सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
मुंबईत, महाराष्ट्रात नोंदवली गेली आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परमबीर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिंह यांच्या याचिकेवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर आणि या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एपीआय वाझेला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची खूपच बदनामी झाली होती. यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई केली गेली. यानंतर परमबीर सिंह ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर महिना १०० कोटी खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. या दोन्ही प्रकरणात दाखल केलेल्या सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय काय निकाल देणार यावरच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.