औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Zoo Aurangabad) ‘समृद्धी’ वाघिणीने एका बछड्याला जन्म दिला आहे. तीन वर्षांपूर्वी समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर आता समृद्धी वाघीण पुन्हा गर्भवती होती.समृद्धीने बछड्याला जन्म देऊन चौथ्यांदा आई बनली आहे. दरम्यान काल सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान एका बछड्यास तिने जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, मागील २८ वर्षांत या उद्यानात ४० वाघांचा जन्म झाला आहे. आता ही संख्या ४१ वर पोहचली आहे.
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे.सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे “सिद्धार्थ” नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
याच प्राणीसंग्रहालयातील पिवळ्या रंगाच्या वाघ समृद्धी हीने काल (१९ जुलै) रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान एका बछड्यास जन्म दिलेला आहे. मागील २८ वर्षांत या उद्यानात ४० वाघांचा जन्म झाला आहे. आता ही संख्या ४१ वर पोहचली आहे.समृद्धी वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ असून बछडे आईचे दुध पितांना दिसून आले आहे. वाघीण स्वतः बछड्याची निगा आणि काळजी घेत आहे. तसेच वाघिणीच्या, बछड्याच्या २४ तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशी माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर
मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान
मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ
पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका
सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीने प्रथम वेळी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी तीन पिवळे, एक पांढरा बछड्यास जन्म दिला होता. दुसऱ्या वेळी १६ एप्रिल २०१९ रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता, ज्यात दोन पिवळे तर दोन पांढरे होते. तिसऱ्या वेळी २५ डिसेंबर २०२० रोजी पाच पिवळ्या बछड्यांना जन्म दिला होते. त्यानंतर आता तीन वर्षांनी आज १९ जुलै २०२३ रोजी चौथ्यावेळी एका बछड्यास जन्म दिला आहे. तर आतापर्यंत जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे मादी वाघ हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. इतर वाघ प्राणीसंग्रहालयातच आहेत अशी माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.
प्राणिसंग्रहालयातील वैशिष्ट्ये
औरंगाबादमधील नागरिकांसाठी व औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सिद्धार्थ उद्यान आणि या उद्यानाच्या परिसरात असलेले प्राणिसंग्रहाल एक आकर्षणाचा विषय व महत्त्वाचे प्रर्यटनस्थळ आहे.हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येत असतात. उद्यानाच्या परिसरात मत्स्यालय देखील आहे, ज्यात विविध प्रजातींचे मासे आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय देखील उद्यानाच्या परिसरात आहे, त्यामध्ये मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व मुक्तिसंग्रामाचा इतिहास आहे.सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दिवसाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारांच्या घरात आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. सुटीच्या दिवशी यापेक्षा जास्त नागरिक उद्यानात येतात.
तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ होत असते. सिद्धार्थ उद्यानासाठी मोठ्या व्यक्तींना २० रुपये तर, लहान मुलांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या १० वाघ आहेत. त्यांतील सहा मादी तर चार नर आहेत. देशात वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर मनपावर वाघांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. वाघांना योग्य वातावरण मिळणाऱ्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील २८ वर्षांत ४० वाघांचा जन्म झाला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वाघ हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.मात्र, पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.