पं. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत पराभव सहन न झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या एका उमेदवाराने मतपत्रिका चावल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर प. बंगालमधील अशोकनगर येथील एका मिठाईच्या दुकानाने ‘बॅलट पेपर संदेश’ नावाची मिठाई दाखल केली आहे.
एका स्थानिक मिठाईविक्रेत्याने ही शक्कल लढवली आहे. संदेश ही बंगालमधील लोकप्रिय मिठाई दूध आणि साखराच्या मिश्रणाने तयार केली जाते. या मिठाई विक्रेत्याने या मिठाईला बॅलट पेपरचा आकार दिला आहे. तृणमूलच्या उमेदवाराने मतपत्रिका चावल्याची घटना ताजी असल्याने लोकांचे लक्ष या मिठाईने वेधले आहे.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार
दहशतवादविरोधी पथक हे अमली पदार्थविरोधात नोडल पथक
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी शिंपलाकृती इमारत
मिश्ती महल या मिठाई दुकानाच्या मालकाने ही मिठाई दाखल केली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील अशोकनगरमधल्याच महादेव माती या उमेदवाराने मतपत्रिका चावली होती. या घटनेवरूनच आपण अशा प्रकारची मिठाई साकारण्याची कल्पना लढवली, असे या मिठाईदुकानाचे मालक सुमन पाल यांनी सांगितले. या वेगळ्या प्रकारच्या मिठाईला पाहण्यासाठी अनेक ग्राहक येत आहेत. लोक उत्सुक असून त्यांना बॅलट पेपर संदेश मिठाईची चव चाखायची आहे, असेही पाल यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान मतमोजणी सुरू असतानाच महादेव माती यांनी मतपत्रिका चावल्याचा आरोप आहे. या निवडणुकीत माती यांचे प्रतिस्पर्धी माकपचे रबिन्द्रनाथ मुझुमदार यांचा विजय झाला होता. मात्र मतपत्रिका चावल्याच्या घटनेनंतर येथे पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.