सध्या चर्चेत असलेली सीमा हैदर हिला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. गैरमार्गाने भारतात प्रवेश करणी सीमा हैदर हिच्या नावाची गेले अनेक दिवस चर्चा आहे. सचिन मीणा नावाच्या तरुणाच्या प्रेमापोटी ती आपल्या चार मुलांसह भारतात आल्याचे स्पष्ट होते आहे. आता पोलिस तिच्याकडून कोणती माहिती काढतात हे स्पष्ट होईल.
उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने तिची ओळखपत्रे उच्चायुक्तांकडे पाठविली आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमा हैदर हिचे काका हे पाकिस्तान लष्करात सुभेदार आहेत तर तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. त्यामुळे ती सुद्धा एक पाकिस्तानी एजंट आहे का याबद्दल संशय बळावू लागला आहे.
सध्या उत्तर प्रदेश एटीएसने तिची चौकशी सुरू केलेली आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्यातील चॅट्स, फोनवर झालेले संभाषण यावरून अधिक माहिती मिळविणार आहे.
गेल्या काही दिवसांत या दोघांमधील प्रेमकहाणी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून ती पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतात आली कशी याविषयीही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे नोएडा पोलिसांनी या प्रकरणात विशेष एजन्सीच्या मार्फत तपास व्हायला हवा अशी मागणी करण्यात आली होती. हे पत्र मिळाल्यानंतर एटीएसने या प्रकरणात जातीने लक्ष घातले. ती पाकिस्तानातून भारतात आली कशी यासंदर्भातही एटीएस तिच्याकडून माहिती घेऊ शकेल. या दोन्ही प्रेमी युगुलाचे जबाबही नोंदविण्यात येतील.
ती पाकिस्तानातून दुबई आणि तिथून नेपाळली कशी गेली, तिला कुणी मदत केली, दुबईहून भारतात येण्यासाठी तिला कुणाचे सहाय्य मिळाले अशा सगळ्या गोष्टींची शहानिशा एटीएस करणार आहे. त्याशिवाय, सचिन मीणा याची पार्श्वभूमी काय, त्याचा तिच्याशी कसा काय संबंध आला, या दोघांमध्ये कोणत्या स्वरूपाचा संवाद होत होता, कोणत्या इंटरनेट सुविधांचा वापर या दोघांनी केलेला आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहितीही एटीएसकडून घेतली जाणार आहे.
याच दरम्यान सीमा हैदरला मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथी गटांनीही याविरोधात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमा हैदरला सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. सध्या सीमा हैदर आणि सचिनसह त्यांच्या कुटुंबियांना मीडियापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीमा भारतात आल्यानंतर तिचे सासरे मीर जान यांनी पाकिस्तानातून सांगितले की, ती सात तोळे सोने घेऊन फरार झालेली आहे. सीमाला पकडण्यात आले तेव्हा तिच्याकडे पाच स्मार्टफोनही सापडले.