सन २०१७पासून विम्बल्डन स्पर्धेत एकदाही पराभूत न झालेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला स्पेनच्या कार्लोस अल्कराझने रविवारी पराभवाची धूळ चारून आपले पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे जोकोविचने रॉजर फेडररच्या विक्रमी आठ विम्बल्डन जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी गमावली तर, अल्कराझचे हे दुसरे ग्रँडस्लॅम आहे. अल्कराझ याने विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत जोकोव्हिचवर १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवला.
जोकोविच गेल्या चार विम्बल्डन स्पर्धांत विजेता ठरला होता. तसेच, त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचेच पारडे जड मानले जात होते. सामन्याची सुरुवातही जोकोव्हिचने धडाक्यात केली. जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये अल्कराझची सर्व्हिस दोनवेळा तोडत ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याने पहिला सेट ६-१ असा जिंकला. त्यानंतर मात्र अल्कराझने मोठ्या झोकात पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझने टायब्रेकरमध्ये बाजी मारली. तिसरा सेट जोकोविचने १-६ असा गमावला. मात्र चौथ्या सेटमध्ये त्याने पुन्हा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. मात्र पाचव्या सेटमध्ये कडवी झुंज देत अल्कराझने दुसरे ग्रँडस्लॅम पटकावले. पाचवा सेट २६ मिनिटे रंगला. सेंटर कोर्टवर तब्बल चार तास ४२ मिनिटे हा सामना रंगला.
हे ही वाचा:
सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
२० वर्षीय अल्कराझ विम्बल्डन विजेतेपद मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. अल्कराझ याला या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले असले तरी त्याने जोकोविचवर मिळवलेला हा विजय धक्कादायक मानला जात आहे.
जेव्हा जोकोविचने सन २००८मध्ये आपले पहिले ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जिंकले होते, तेव्हा अल्कराझची वयाची पाच वर्षेही पूर्ण झाली नव्हती. जोकोविच यंदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यासाठी नवव्यांदा सेंट्रल कोर्टवर उतरला होता. तर, त्याची ३५वी ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. तर, अल्काराझ याचा अमेरिकी ग्रँडल्सॅमनंतर केवळ दुसरा महत्त्वाचा सामना होता. जोकोविचला या आधी सन २०१३मध्ये सेंट्रल कोर्टमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अँडी मरेने पराभूत केले होते.