सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या भूमिकेबद्दल सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हा उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले आहेत, हेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष या परिस्थितीत दिसतो आहे. मी त्यांना कमी लेखत नाही. संख्याबळाला महत्त्व असते २१० आमदार आज सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विरोधकांची अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरोधी पक्षांचा जो अधिकार आहे, त्यानी प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. पण दुर्दैवाने चहापानाला उपस्थित न राहून त्यांनी ते दाखवले नाही. पण या प्रश्नांना न्याय देण्याचे काम आम्ही करू.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे. त्यांना चहापानाचे निमंत्रण होते पण ते आले नाहीत. खरे तर त्यांना विषयाचीच नीट माहिती नाही. पत्र लिहिण्याऐवजी त्यांनी थेट ग्रंथच लिहिला आहे. लक्षवेधी एकत्र करून त्याचेच पत्र तयार केले आहे. विरोधी पक्षावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, विधानसभा हे लोकशाहीचे प्रतीक आहे. पण विरोधी पक्ष कायदेशीर सरकारला बेकायदेशीर म्हणतो आहे. ते अद्याप मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत.
हे ही वाचा:
अजित पवारांसह फुटीर आमदार अचानक शरद पवारांना भेटले
लिओनेल मेस्सी अधिकृतपणे इंटर मियामीमध्ये दाखल
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांची बस नाल्यात कोसळली
बांद्रा बँडस्टँड येथे भरतीच्या लाटेने नेले महिलेला ओढून
विरोधी पक्षांनी खरेतर महाराष्ट्राच्या प्रगतीकडे बघितले पाहिजे. आमचे सरकार आल्यावर उद्योग पळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पण वर्षभरात परदेशी गुंतवणूकीच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर वन आहे. इंडिया टुडे ग्रुपनेच सर्वेक्षण केलेले आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात २.३८ लाख कोटी रुपये गुंतवणूक झालेली आहे. कर्नाटकात ८१ हजार कोटी, गुजरात ७४ हजार कोटी आणि उत्तर प्रदेश ४८ हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक आहे. मग महाराष्ट्र मागे आहे, असे विरोधक कोणत्या जोरावर म्हणत आहेत. कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांची गुंतवणूक एकत्र केली तरी ती महाराष्ट्रापेक्षा अधिक नाही. याचा अर्थ उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्रावर विश्वास आहे.
शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर तिथेही महाराष्ट्र अव्वल आहे. भारतात महाराष्ट्र शिक्षणात सातव्या क्रमांकावर गेल्याचा आरोप करण्यात येत होता. पण शिक्षणाच्या बाबतीत दहा श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या पाच श्रेणीत कुठलेही राज्य नाही. सहाव्या श्रेणीत चंदीगढ आणि पंजाब आहेत तर सातव्या श्रेणीत महाराष्ट्र आहे. याचा अर्थ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सातव्या नाही.
अजित पवार म्हणाले की, बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेणे ही आमची भूमिका राहणार नाही. आम्ही चर्चा केली महत्त्वाचे प्रश्न आहेत, लोकशाहीत कुणालाही कमी लेखले जाणार नाही. कुठल्याही भागातील प्रश्न चांगल्या भूमिकेतून सोडविले जातील. तीन आठवड्यात असे काम पाहायला मिळेल. पावसाचे म्हणावे असे प्रमाण नाही. काही ठिकाणी पेरण्या कमी आहेत. पण पुन्हा पाऊस झाला तर चित्र बदलू शकेल.