शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत बाहेर पडलेले अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी रविवारी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अचानक भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ही भेट नेमकी कशासाठी झाली याविषयी चर्चा होत राहिल्या. पूर्वनियोजित भेट नसली तरी अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदार व नेते पवारांच्या भेटीसाठी तिथे रवाना झाले होते.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे सर्वांचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत हे कळल्यानंतर आम्ही सगळे तिथे गेलो. शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना आम्ही विनंती केली की, त्यांच्याबद्दल आदर आहेच पण राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहील यासाठी त्यांनी विचार करावा आणि मार्गदर्शन करावे.
प्रफुल्ल पटेल असेही म्हणाले की, याबाबत शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी सगळे आमदार मुंबईत आलेले असताना ही भेट झाली. पवारांशी भेट झाल्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. शरद पवार यांनी यासंदर्भातील मत व्यक्त केले नसले तरी त्यांची भूमिका नेमकी काय याची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा:
बांद्रा बँडस्टँड येथे भरतीच्या लाटेने नेले महिलेला ओढून
आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहचे पुनरागमन होण्याची शक्यता
लिओनेल मेस्सी अधिकृतपणे इंटर मियामीमध्ये दाखल
भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा
शरद पवारांची दिलगिरी व्यक्त केली!
मात्र शरद पवार यांच्यासोबत असलेले जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली. जयंत पाटील यांना त्याआधी विचारण्यात आले तेव्हा आपल्याला अशी मंत्र्यांची पवारांशी कोणती भेट आहे अथवा नाही, हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावले म्हणून आपण तिथे जात आहोत असे ते म्हणाले होते.
पण ही भेट झाल्यावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार तिथे उपस्थित होते. त्यांनी पवारांची दिलगिरी व्यक्त केली. त्याच्या मार्ग काढा अशी विनंती केली. शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते म्हणाले की, आम्हाला या भेटीची कल्पना नाही. पण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात वावगे काय. राजकीय समीकरणांची मात्र मला कल्पना नाही.