राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चलबिचल आहे. भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही बाब चांगलीच ओळखून आहेत. त्यामुळे महाविजय २०२४ या प्रशिक्षण वर्गात बोलताना फडणवीस यांनी याच मुद्द्यावर बराच वेळ खर्ची घातला. परंतु फडणवीस कार्यकर्त्यांना जे समजवण्याचा प्रय़त्न करीत होते तीच बाब काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वाक्यात सांगितलेली आहे.
भिंवडी येथे काल भाजपाचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग पार पडला. महाराष्ट्रातील प्रमुख भाजपा पदाधिकारी या शिबीराला हजर होते. देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी दमदार भाषण झाले. ‘जेव्हा समुद्र मंथन होत असते, परिवर्तनाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा कार्यकर्त्यांनी संयम आणि विश्वास बाळगणे गरजेचे असते. शिवसेनेसोबत आपले नाते भावनिक आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली मैत्री निव्वळ राजकीय आहे’, असे त्यांना कॅमेराच्या समोर ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपाने राजकीय समीकरणांची फेरमांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सरकार सोबत घेतला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात प्रचंड रोष आहे. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असल्यामुळे यावर उघडपणे कोणीही बोलत नाही इतकेच. या मुद्द्यावर कदाचित म्हणूनच फडणवीस भिवंडीमध्ये सविस्तरपणे बोलले. त्यांनी आपली मनमोकळी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.
‘राजकारणात अपमान सहन करावे लागतात, परंतु कोणत्याही परिस्थितीत बेईमानी सहन करू नका’, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांना ‘बंद दारा आड झालेल्या चर्चे’चा संपूर्ण तपशील पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसमोर मांडला. महाराष्ट्रात राजकीय सारीपाठावरील सोंगट्या का हलवाव्या लागल्या याचा लेखाजोखा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवला.
एका बाजूला फडणवीस बोलत असताना दुसऱ्या बाजूला ‘मुंबई तक’ या वाहिनीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलाखत सुरू होती. ते जे काही म्हणाले ते ऐकल्यानंतर भाजपाने गेल्या काही दिवसांत केलेले राजकारण का केले, त्याचा उलगडा होऊ शकतो. अर्थात राजकीय पक्षाचा नेता कॅमेरासमोर बोलताना खरे बोलेल याची शाश्वती नसली तरी बाळासाहेब थोरात हे संयमी आणि विचारी नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी जे काही सांगितले त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होता.
‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फोडणे ही भाजपाची गरज होती. हे तीन पक्ष एकत्र आले तर अपेक्षित निकाल लागणार नाहीत, याची खात्री असल्यामुळे ही आघाडी फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार याची आम्हाला खात्री होती. अजित पवार यांच्याकडून तसे संकेत मिळत होते’, असे थोरात यांनी स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रात विजय मिळवण्यासाठी मविआ फोडण्याची रणनीती भाजपासाठी आवश्यक बनली होती.
हे ही वाचा:
कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्माची शतके आणि विक्रमी भागीदारी
…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!
बाळासाहेबांनी सांगितलेला दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. ‘अशोक चव्हाण भाजपासोबत जाणार अशी वावड्या अनेक दिवस उठत होत्या, परंतु भारत जोडो यात्रेचे सर्वात भव्य स्वागत नांदेडमध्ये झाले आणि अशोक चव्हाणांनी त्या वावड्यांना कृतीतून उत्तर दिले’. त्याचे कारण त्यांनी सांगितले, ‘ज्यांच्या पिढ्यान पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या, ज्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते भाजपासोबत कसे जातील?’ परंतु अजित पवारांबाबत जेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ‘अजित पवारांची पार्श्वभूमी काँग्रेसची आहे. शरद पवार हे डाव्या विचारांचे म्हणून ओळखले जातात. परंतु तरीही ते भाजपामध्ये गेले. ते भाजपासोबत गेले म्हणजे त्या विचारधारेसोबत गेले’.
बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितले, भाजपासोबत जाणे म्हणजे त्यांच्या विचारधारेसोबत जाणे. अमोल मिटकरी यांच्यासारखा जातवादी आमदार अजितदादांसोबत भाजपामध्ये गेला, तो रा.स्व.संघाबाबत अजूनही गरळ ओकतोय, परंतु अजितदादा संघाच्या विरोधात किंवा भाजपाच्या विरोधात कधी एका शब्दाने बोलले नाहीत. भाजपाच्या ध्येयधोरणांचे नरेंद्र मोदींचे त्यांनी कौतुकच केले. बाळासाहेब जे काही म्हणाले तेच फडणवीस भिवंडीत कार्यकर्त्यांना समजावून सांगत होते. राजकारणात समोरच्याला कधी सगळेच उलगडून सांगायचे नसते, परंतु अनेकदा बोलण्याच्या ओघात असे एखादे वाक्य निघून जाते ज्यात बराच राजकीय अर्थ भरलेला आहे.
भाजपाने गेल्या चार दशकांच्या वाटचालीत काँग्रेस, मुस्लीम लीग, डावे पक्ष वगळता अनेक पक्षांशी युत्या आघाड्या केल्या, परंतु कधी विचारधारा सोडली नाही. जेव्हा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाशी युती केली त्यानंतर काय झाले हे सगळ्या जगाने पाहीले. भाजपाने कधीही विचारधारा सोडली नाही, हे बाळासाहेबांसारख्या नेत्याला पक्के ठाऊक आहे, भाजपासोबत जाणाऱे त्यांच्या विचारधारेला आडवे येऊ शकत नाहीत, त्यांना त्याच विचारधारेसोबत फरफटत जावे लागते, हे जे फडणवीस उघडपणे बोलू शकत नाहीत, ते बाळासाहेब सांगून मोकळे झाले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)