मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, १३ जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून पहिली सभा ठाण्यात पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
“आम्हाला फार बोलायला लावू नका, बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे बोलायला बरचं आहे आणि आम्ही ते सांभाळून ठेवलं आहे हे विसरू नका,” असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला. दगाबाज कोण आणि वफादार कोण आहे हे जनतेने ठरवले आहे. घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कसं कळणार? असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“आपला जन्म सत्तेसाठी झालेला नसून बाळासाहेब ठाकरे यांनी कितीतरी वेळा सत्तेला लाथ मारली आहे. मात्र, दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायमचं दूर केलं होतं त्यांना तुम्ही जवळ केलं,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
“बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवले, ज्या मतदारांनी निवडून दिलं, बहुमत दिलं, त्यांच्याशी दगाबाजी कुणी केली?” असा खडा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार; जाहीर झाले बेलआऊट पॅकेज
भारत- फ्रान्स यांच्यात ९० हजार कोटींचा संरक्षण करार होणार?
चांद्रयानच्या यशस्वी उड्डाणासाठी तिरुपतीला साकडे
बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले
“आम्हीसुद्धा बोलू शकतो. आम्हालाही बोलता येतं. पण, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची संस्कृती, परंपरा आहे. त्यांनी काही गोष्टी शिकवल्या आहेत. आम्ही मर्यादा सोडून बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असा होत नाही. आमच्याकडे सगळं आहे आणि ते काढायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. तोंड लपवायला लागेल,” असा गंभीर इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
“देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले की, जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलं आहे. अन्यायाविरुद्ध लढा. अन्याय सहन करु नका, म्हणून आम्ही निर्णय घेतला,” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.