लोकशाहीत कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कधी काळी गलिच्छपणा हाच ज्यांच्या भाषेचा अलंकार होता, अजूनही जो त्यांच्या वक्तव्यात वरचे वर डोकावत असतो, त्या शिउबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे इतरांच्या गलिच्छ भाषेवर बोलू शकतात? ज्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अर्वाच्च भाषाशिरोमणी आहे, ज्यांचे पक्ष प्रमुख पांचट कोट्या सम्राट आहेत, त्या अंधारेबाई इतरांचे संस्कार काढू शकतात? परंतु जर जितेंद्र आव्हाड भगवद् गीतेवर बोलू शकतात मग अंधारे बाईंनी काय घोडं मारलंय. त्यांनाही हक्क आहेच की!
‘सोनियांसमोर झुकणारे हिजडे असतात’, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाक्याचा दाखला देत भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना तृतीय पंथीयांचा प्रमुख म्हटले. या वक्तव्यामुळे तृतीयपंथीय दुखावले गेले आहेत. त्यांनाही उद्धव ठाकरेंना आपले प्रमुख म्हटलेले आवडले नाही. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावणे स्वाभाविक होते. त्या भावनांची कदर व्हायलाच हवी. म्हणूनच नीतेश राणे यांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
नीतेश राणे यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी एक तर व्यक्त व्हायला नको होतं किंवा त्यांनी फक्त राणेंना दोष द्यायला नको होता. कारण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्याचा हवाला दिला होता. ज्या भाषेत राणे ठाकरेंबद्दल बोलले त्यापेक्षाही अचकट विचकट भाषेत अंधारेबाई बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य या तिघांबाबत बोलल्या आहेत. त्या त्यांचा पूर्वेतिहास विसरल्या आहेत, की त्या लोक त्यांचे बोल विसरले या गैरसमजात आहेत? कधी काळी अशीच भाषा वापरणाऱ्या अंधारेबाई शिउबाठाच्या उपनेत्या झाल्या म्हणून त्यांना राणे यांचे संस्कार काढण्याचा परवाना मिळत नाही. शिउबाठामध्ये दाखल झाल्यानंतर पूर्वीच्या वक्तव्याबाबत अंधारेबाईंनी शिवसैनिकांची माफी मागितल्याचे आमच्या तरी ऐकीवात नाही. हिंदू देव देवतांचीही त्यांनी यथेच्छ टिंगल केलेली आहे. त्याबद्दलही त्यांनी हिंदू समाजाची माफी मागितलेली नाही.
वारकऱ्यांसाठी पोळ्या वाटून आणि तुळजा भवानीचे दर्शन घेऊन पूर्वीची वक्तव्य डीलीट होत नाहीत. राजकीय नौटंकी करून जुनी कर्म नष्ट होत नाहीत. याच अंधारेबाई ऑफीसमध्ये एसी, सोफ्यासाठी पैसे मागतात असा आरोप करून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पा साहेब जाधव यांनी त्यांना मारहाण केल्याची जाहीर कबुली दिली होती. तेव्हा पैसे मागणे आणि महिलेला मारहाण करणे हे कोणत्या पक्षाचे संस्कार आहेत ते लोकांच्या समोर उघड झाले. तुमची भाषा ठाकरी आणि इतरांची गलिच्छ हा दांभिक तर्क न टिकणारा आहे. ठाकरे भाषा बाळासाहेबांच्या तोंडीच शोभायची. त्यांच्यासोबतच ती संपली. उद्धव ठाकरे ती भाषा वापरतात तेव्हा स्वर्गीय मुकेश यांची कॉपी करणारा त्यांचा मुलगा नीतीन मुकेश यांची आठवण येते.
सत्ताधाऱ्यांच्या मुजोरपणा बाबत बोलण्याचा अधिकार ठाकरेंच्या पक्षाने मविआची सत्ता असतानाच गमावला आहे. ज्यांच्यामुळे पक्षातील दोन महिला पदाधिकारी कंटाळून बाहेर पडल्या त्यांना कुणाच्या मुजोरपणावर बोलण्याचा अधिकार उरला आहे का? मुख्यमंत्रीपदी असताना विरोधकांना मारहाण करणाऱ्यांचा मातोश्रीवर सत्कार करण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरे पंधरवड्यातून एकदा तरी राबवायचे. काल परवाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांचा सत्कार केला. बरं हे मारहाण करणारेही मर्दपणा दाखवतात, असे नाही. झुंडीने जाऊन मारहाण करतात. एकावर टोळीने तुटून पडतात.
हे ही वाचा:
महिला प्रवाशाने कंडक्टरला काढायला लावली जाळीदार टोपी
भीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून अपघात, पाच जखमी
नवाब मालिकांना उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला
बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार; जाहीर झाले बेलआऊट पॅकेज
हे असे लोक संस्कारी भाषा आणि गलिच्छ भाषा यात भेद सांगतायत. शिउबाठाच्या नेत्याने अशा प्रकारचे ज्ञान इतरांना देणे म्हणजे उकीरड्यावर बसून इतरांच्या दुर्गंधीवर बोलण्यासारखे आहे. कंलकला कलंक म्हणायचं नाही तर अष्टगंध म्हणायचे का? हा अंधारेबाईंचा सवाल आहे. ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कंलक म्हटले, त्यावरची ही प्रतिक्रिया. म्हणजे ठाकरे पक्षप्रमुख असल्यामुळे, राऊत प्रवक्ते असल्यामुळे ते करतील ती रासलीला आणि बाकीचे करतील तेव्हा कॅरेक्टर ढीला ही व्याख्या शिउबाठाचे नेते करतायत.
फडणवीसांच्या गृहमंत्री पदाच्या कारकीर्दीत म्हणे क्राईम वाढला आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत तर तुमच्या पक्षाचे नेते महिलांवर अत्याचार करत होते. ती महिलेला शिवीगाळ करणारी तुमच्या पक्षाच्या नेत्याची ऑडीओ क्लीप ऐकली नसेल तर अंधारेबाईंना पाठवून देण्याची व्यवस्था करता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड-दोन वर्षाच्या कोवळ्या नातवाबाबत विकृत बोल बोलणारे उद्धव ठाकरे ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाच्या इतर प्रवक्त्यांकडून संस्कारी बोल बोलण्याची अपेक्षा नाही, परंतु त्यांनी इतरांना संस्काराचे डोस तरी पाजू नये.
काळ मोठा बिकट आला आहे, शरद पवार हिंदुत्वाची व्याख्या करतायत, आव्हाड भगवद् गीतेतील श्लोकांचा दाखला देतायत, कोणताही कामधंदा न करता कोविडच्या काळात मातोश्री दोन उभारणारे उद्धव ठाकरे भ्रष्टाचाराबद्दल बोलतात, संजय राऊत महिला अत्याचाराबाबत बोलतात आणि अंधारे बाई गलिच्छ भाषेबद्दल. ही मंडळी स्वत:ला महाराष्ट्र कलंक नाही अष्टगंध समजतात.