बेंगळुरू महापालिकेच्या बसमध्ये एक महिला प्रवासी कंडक्टरला त्याने परिधान केलेली हिरव्या रंगाची मुस्लिम टोपी काढण्यास सांगून त्याविरोधात तक्रार करण्याची धमकी देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रसंग नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेले नाही.
‘सरकारी सेवेत असताना युनिफॉर्ममध्ये हिरव्या रंगाची मुस्लिम टोपी घालण्यास परवानगी आहे का?,’ हा प्रश्न ही महिला प्रवासी सातत्याने कंडक्टरला विचारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच, एक सरकारी कर्मचारी म्हणून त्याने त्याच्या धर्माचे आचरण घरी करावे, सरकारी नोकरीत असताना नव्हे, असेही ती महिला त्या कंडक्टरला सांगताना ऐकू येत आहे.
हे ही वाचा:
स्वीडनमधील कुराण दहन घटनेच्या पाकिस्तानच्या निषेधाला भारताचा पाठिंबा
द्रयानच्या यशस्वी उड्डाणासाठी तिरुपतीला साकडे
बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले
नवाब मालिकांना उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला
त्यावर या कंडक्टरने ‘मी ही टोपी कित्येक वर्षांपासून परिधान करतोय,’ असे नम्रपणे उत्तर दिल्याचे दिसत आहे. मात्र या महिलेचे समाधान न झाल्याने ती त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करताना दिसते आहे. तसेच, हा मुद्दा प्रशासनाकडे नेणार असल्याचे ती म्हणाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यावर ‘तुम्ही टोप्या घातल्याने कायदा बनणार नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. ती टोपी आताच काढून टाका,’ असे या महिलेने सांगितले. त्यानंतर कंडक्टर ती टोपी काढत असल्याचे या व्हिडीओच्या अखेरीस दिसते आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या महिलेचे वर्तन उद्धट असल्याचे म्हटले आहे.