परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. या धक्क्यातून सावरत आता सर्व नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासआघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झालीच पण काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट झाली.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. “तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे ही वाचा:
कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन
मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर
तत्पूर्वी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे नेते उपस्थित होते. या बैठकीत रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांसंदर्भात केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.