देशात गेल्या २४ तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा दिवसात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात वाईट परिस्थिती असून तिथे तीन दिवसांत १२ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली. जो सामान्यपेक्षा १० पट जास्त आहे. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान- मध्य प्रदेशासह २४ राज्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. त्याचवेळी, १२ जुलैपर्यंत हिमाचलमधील १२ पैकी १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत २०५.७६ मीटरने वाहत होते.
पूर आणि पावसाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासन आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्यात गुंतले आहेत. देशभरात १० जून रोजी ६० टक्के पावसाची तूट होती, ती आता सामान्यपेक्षा २ टक्के जास्त आहे. १० जुलैपर्यंत सामान्य पाऊस २४८ मिमी होता. आता हा आकडा २५४ मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो २ टक्के अधिक आहे.
हे ही वाचा:
कलम- ३७० विरोधातील याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी
मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती
येत्या २४ तासांत देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार आणि झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.