आरोग्य आणि तपासणी संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना नेहमीच दवाखाने आणि इस्पितळांच्या चकरा माराव्या लागतात. जेव्हा रुग्णाची अवस्था चिंताजनक असते आणि त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असते तेव्हा या सर्व गोष्टी आणखी गंभीर होतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मीरा-भाईंदरच्या आमदार गीता भरत जैन यांनी पुढाकार घेऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील पहिली तपासणी रुग्णवाहिका सुरु केली आहे. ही वैद्यकीय रुग्णवाहिका मीरा रोड आणि भाईंदर येथील रहिवाशांच्या परिसरात येऊन त्यांना सेवा आणि वैद्यकीय सुविधा प्रदान करेल.
या रुग्णवाहिकेचे उद्घाटन रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मीरा रोड आणि भाईंदरमधील रहिवाशांना तब्बल ६० वैद्यकीय चाचण्या आणि डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे मीरा रोड आणि भाईंदरमध्ये १० ’आपला दवाखाना’ सुरु होणार आहेत. त्याचबरोबर लोकांच्या दारात वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी वैद्यकीय रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही वैद्यकीय सुविधा कार्यान्वित झाल्याने मीरा रोड आणि भाईंदर येथील रहिवाशांच्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सुटणार आहे.
या रुग्णवाहिकेमुळे घर ते रुग्णालयादरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णांना त्रासापासून दिलासा प्राप्त होणार आहे. रुग्णवाहिकेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ’हा एक अद्वितीय उपक्रम आहे. सरकार आणि आमदार आपल्या जबाबदार्यांबाबत किती जागरुक आहेत, हे या उपक्रमातून आपल्याला दिसून येते. मीरा रोड आणि भाईंदर येथील लोक या सेवेचा पुरेपूर लाभ घेतील आणि निरोगी राहतील अशी आशा मी व्यक्त करतो.’
स्थानिक आमदार गीता जैन यांनी सांगितले की, ’माझे ध्येय समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळवून देण्याचे आहे. आजच्या काळात वैद्यकीय सुविधा खूपच महाग झाल्या आहेत आणि लोकांना सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो, अशा परिस्थितीत लोकांना या रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या परिसरात वैद्यकीय आणि तपासणीची सुविधा मिळणार आहे, ही अभिमानाची बाब आहे.’
हे ही वाचा:
कोविड घोटाळा प्रकरणात दंड केलेल्या कंत्राटदारालाच ३०० कोटींचं कंत्राट !
उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाःकार; रस्ते, पूल गेले वाहून
‘खलिस्तानी हे शीख नाहीत’ म्हणत कॅनडात भारतीयांची रॅली!
घरातल्या पदार्थातून टॉमेटो झाला गायब; कोकम, लिंबू, चिंचेला आले महत्त्व
कशी आहे रुग्णवाहिका?
या रुग्णवाहिकेत मेडिकल कियोस्क बसवण्यात आले आहे. ज्याद्वारे कोणत्याही रुग्णाच्या प्राथमिक चाचण्या १० मिनिटांत केल्या जाऊ शकतात. चाचणी व्यतिरिक्त मेडिकल रिपोर्ट लगेच व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातील. हे रिपोर्ट्स ऑनलाइन उपलब्ध करुन दिले जातील. आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिकेत बसवलेल्या स्क्रीनद्वारे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांशी संवाद साधतील आणि ऑनलाईन रिपोर्ट पाहून प्राथमिक उपचार केले जातील. रुग्णाची प्रकृतीनुसार आणि रोगनिदानानुसार पुढील वैद्यकीय पावले उचलले जातील. आवश्यक असल्यास ऍडव्हांस वैद्यकीय चाचण्या देखील केल्या जातील.
या सेवेचा लाभ घेणार्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय कार्ड दिले जाईल आणि रिपोर्ट अमर्यादित काळासाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. येत्या काळात रुग्णाचा डेटा आयुष्यमान भारत कार्डशी जोडण्याचा विचार आहे.
वैद्यकीय रुग्णालयाची किंमत किती आहे?
या दोन्ही रुग्णवाहिका आमदार गीता जैन यांच्या शासकीय निधीतून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करुन बनवण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकांची उपयुक्तता आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन येणार्या काळात रुग्णवाहिकांची संख्या वाढवली जाऊ शकते. प्रत्येक रुग्णवाहिकेत एक चालक, पॅरामेडिकल कर्मचारी आणि एक तंत्रज्ञ उपस्थित असेल.
रुग्णवाहिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरत शेठ गोगावले, ठाणे कलेक्टर अशोक शिंगारे, मीरा भाईंदर नगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस कमिश्नर मधुकर पांडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष रवी व्यास, जिल्हा प्रमुख राजू भोईर, पूर्वेश सरनाईक उपस्थित होते.