राज्यातील विविध तुरुंगात असलेल्या शिक्षा भोगत असणाऱ्या तसेच न्यायालयीन कैदेत असणाऱ्या विदेशी नागरिक असलेल्या कैद्यांना देण्यात आलेल्या व्हिडीओ कॉल सुविधेत वाढ करण्यात आली आहे. या कैद्यांना दोन आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल मार्फत आपल्या कुटुंबासह १५ मिनिटे बोलण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी,बांग्लादेशी नागरिक आणि अतिरेकी कैद्यांना ही सुविधा देण्यात आलेल्या नाही.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तुरुंगात वेगवेगळ्या गुन्ह्यात ६३७ कैदी आहेत, त्यापैकी ११४ महिला कैदी आहे.त्यापैकी ३२ कैद्यांना शिक्षा झालेली असून उर्वरित कैदी न्याय प्रतीक्षेत तुरुंगात आहेत.
महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई -प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु सदरची सुविधा अद्याप विदेशी बंद्यांना देण्यात येत नव्हती.
विदेशी बंद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून सदरची सुविधा पुरवून मानवी हक्कांचे सरंक्षण करणे गरजेचे आहे असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढून कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी ४ जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सदरील सुविधा पाकिस्तानी,बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील कैदी वगळता इतर विदेशी बंद्यांना देण्यात यावी असे निर्देश राज्यातील सर्व तुरुंग अधिकारी यांना दिले आहे. या सुविधेत दोन आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलचा वेळ १५ मिनिटांचा ठेवण्यात यावा असे ही निर्देशात म्हटले आहे.
६३७ परदेशी कैद्यांपैकी विशेषतः मुंबई,नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी,घाना, ब्राझील,थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन विविध तुरुंगात आहेत.
हे ही वाचा:
शरद पवारांची अध्यक्षपदी निवड; अजित पवारांचा आक्षेप
भारतासह पाच देशांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक; विकसित देशांच्या गुंतवणुकीत मात्र घट
सूत्रांच्या पूड्यांचा अर्थ एवढाच महाविकास आघाडीचे तारु बुडते आहे
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!
विदेशी बंद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सूटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी बंद्यांमध्ये नैराश्य वाढू लागते त्यामुळे कारागृह प्रशासनाला सदर बंद्यांवर सतत निगराणी ठेवावी लागते .सदरची सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंद्यांची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.