काहीजणांकडून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी अफवा पसरवली जात आहे, मात्र मुख्यमंत्री राजीनामा देण्याचे वृत्त अत्यंत चुकीचे आहे. आम्ही राजीनामे देणारे नाही तर राजीनामे घेणारे आहोत. वर्षभरापूर्वी आम्ही ते दाखवून दिले आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बैठकीत ज्या गोष्टी घडल्याच नाहीत. त्या प्रसारमाध्यमांकडे जाणिवपूर्वक पोचवल्या जात आहेत, मात्र शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून पक्षात कोणतीही नाराजी नाही, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दुसरीकडे शिंदे गटात नाराजीच्या बातम्या सुरु झाल्या.शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी तर नाराजी व्यक्त करून दाखवली होती.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी भाजप पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन केले.शिंदे-फडणवीस यांचं डबल इंजिनचे सरकार अगदी वेगाने काम करत आहे.मात्र, आता या सरकार मध्ये राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे देखील सरकार मध्ये सामील झाले आहेत.अजित पवार यांच्या सरकारमध्ये एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांची चांगलीच गोची झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिपद मिळेल या आशेवर बसून आहेत.
तोच अजित पवार यांनी मागून येऊन आपल्या सोबत आठ जणांना मंत्री बनवले.त्यामुळे शिंदे गट आपापसात भिडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे उदय सामंत यांनी सांगत पूर्णविराम दिला.सामंत म्हणाले आमच्या पक्षाच्या गटात कोणीही नाराज नाही,येणाऱ्या निवडणुका शिंदेच्या नेतृ्त्वाखाली लढणार असल्याचे सामंत म्हणाले.एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील व शिंदे साहेब राजीनामा देणार हे वृत्त बिनबुडाचे आहे. हे वृत्त पसरवणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत यांनी ठणकावले.
आम्हाला महायुतीवर ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील हे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या घडल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे ४० आमदार व १० अपक्ष आमदार राजकारणात ज्येष्ठ आहेत. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कालच्या बैठकीत राष्ट्रवादी सोबत जायचे नाही, असे भाषण रामदास कदम यांनी केल्याची माहिती खोडसाळ आहे, असा खुलासा सामंत यांनी केला.
पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे जास्तीत जास्त मंत्री शपथ घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. आमच्या सहकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व संयमी, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत काहीही बोलले तर चालेल असे समजून अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. बैठकीत सर्वांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
विधानसभा, लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कसे काम करावे, यावर बैठकीत चर्चा झाली. मंत्र्यांवरील जबाबदारी, बुथस्तरावर काम करण्यासाठी संघटना अधिक मजबूत करणे, आमदारांची संख्या वाढण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिन्ही नेते तळागाळात काम करणारे आहेत. त्यांना राज्याच्या सर्व मतदारसंघाची व्यापक माहिती आहे. त्यामुळे तीन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार सामंत यांनी व्यक्त केला.
कोण किती जागा लढवणार याबाबत तीन्ही नेते एकत्रित निर्णय घेतील. राष्ट्रवादी ९० जागा लढवणार या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात. त्यांनी म्हटले म्हणून त्यांना लगेच जागा मिळाली असे होत नाही. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले भाकरी पूर्ण मिळण्याऐवजी अर्धी मिळेल असे म्हणाले, नाराजी वगैरे काही नाही, असा खुलासा त्यांनी केला. मनसे व उबाठा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी काय करावे याबाबत मी बोलू शकत नाही, असे सामंत म्हणाले.
आमच्यावर टीका करणाऱ्यांनी राष्ट्रवादीने महायुतीत प्रवेश केल्यावर खोके, गद्दार ही टीका का बंद झाली हे देखील सांगावे. गद्दार, खोके म्हणून हिणवणे माझ्या स्वभावात नाही, मी लोकशाही मानतो असे पवार म्हणाले होते, खोके-गद्दार टीका करणाऱ्यांनी पवारांचा हा गुण घ्यावा, असे ते म्हणाले. नाशिक पालकमंत्री पदाबाबत दादा भुसे नाराज नाहीत असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.