राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी आपल्या कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत आपल्या मनात अनेक वर्षांपासून साचलेली सगळी खदखद बाहेर काढली.
बुधवारचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या शक्तीप्रदर्शनाचा होता. दोघांना किती आमदारांचा पाठिंबा मिळतो, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात अजित पवारांना ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले तर शरद पवारांना १६ आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या दोघांच्या शक्तीप्रदर्शनात अजित पवार यांचे पारडे ज़ड असल्याचे दिसले.
अजित पवारांनी आपल्या या तासा दीडतासाच्या भाषणात शरद पवार यांच्यावर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली. पण त्यात त्यांनी वारंवार त्यांना दैवत अशी उपमा देत त्यांच्याकडून आपला अपेक्षाभंग झाल्याचेही सांगितले. अजित पवार शरद पवारांच्या वयावरून थेट बोलले. ते म्हणाले की, आता त्यांचं वय ८३ वर्षे झाले आहे. तुम्ही थांबलं पाहिजे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. तुम्ही राजीनामा दिला होतात, पण दोन दिवसांनी काय घडलं कुणास ठाऊक पण राजीनामा मागे घेतलात. राजीनामा दिला होतात तर तो मागे घेतलाच कशाला?
हे ही वाचा:
शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं
दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, उपराज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार
अजित पवार म्हणाले की, सर्व क्षेत्रात निवृत्तीचं वय ठरलेलं आहे. राजकारणात भाजपाने ७५ची मुदत ठरविली आहे. पण तुम्ही निवृत्त होण्याचे नाव घेत नाही. आता आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. काही चुकलं तर कान धरा. तुम्ही राजीनामा दिलात तेव्हा एक समिती बनविण्यात आली. आम्ही सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करू असे ठरले. त्याला आम्ही मान्यता दिली. पण राजीनामा मागे घेतला. मी सुप्रियाला सांगितले होते की, ते हट्टी आहेत. पण असा हट्ट तरी कुठला आहे त्यांचा.
कुणाच्या पोटी जन्मलो नाही ही चूक आहे काय?
हे सांगत असताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख करत त्यावरूनही पवाराना सुनावले. ते म्हणाले की, तुम्ही अध्यक्षपदी अजूनही आहात. का केलं जातंय हे. कशासाठी केले जात आहे. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवार म्हणाले की,
अजित पवारांनी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून शरद पवारांच्या दुटप्पीपणावर प्रहार केला. ते म्हणाले की, २०१७साली पक्षाच्या वरिष्ठांना शिवसेना जातीयवादी वाटत होती. मग दोन वर्षांत महाराष्ट्र विकास आघाडी सोबत का गेलात? दोन वर्षांत अशी काय परिस्थिती बदलली. जर शिवसेना ही जातीयवादी होती तर ती नंतर जातीयवादी का राहिली नाही. भाजपा आता कसा काय जातीयवादी ठरला. असे कसे चालेल?
राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची अनेकवेळा संधी आली पण पवारांनी ती घालविली असेही अजित पवार म्हणाले. तब्बल चार वेळा शरद पवारांनी मुख्यमंत्री होण्याची संधी गमावली. आपल्यालाही तशी संधी होती असेही ते म्हणाले. ते सांगताना आपली गाडी नेहमी उपमुख्यमंत्रीपदावर का अडते. त्याचा तर आता एक विक्रमच झाला आहे असे सांगत. त्याच्या पुढे जायचे आहे की नाही, असा सवालही त्यांनी विचारला. राज्याचा मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा आहे, अशी इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखविली.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही मला उपमुख्यमंत्रीच करण्यात आले. मी त्यावर काहीही बोललो नाही. कोरोना काळात भरपूर काम केले. पण त्याचवेळी शिवसेनेत अस्वस्थता होती. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले की, काहीतरी घडत आहे पण त्याकडे कुणी लक्ष दिले नाही.
शिंदेंच्या बंडावेळी राष्ट्रवादीचा दावा
अजित पवार म्हणाले की, शिंदे यांनी बंड केले तेव्हा आम्ही ५३ आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार केले होते. भाजपासोबत सत्तेत जाण्याचा विचार केला गेला होता. पण वरिष्ठांनी त्याला होकार दिला नाही. ते पत्र अजूनही माझ्यासोबत आहे.