महाराष्ट्रात काल जे काही घडलं त्या धक्क्यातून अनेकजण अद्यापि सावरलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा या गटाने केलेला आहे. सर्वसामान्य जनतेलाही प्रश्न पडलेला आहे की ही खेळी नेमकी कुणाची? शरद पवारांनी पुन्हा गुगली टाकलाय की ते हीट विकेट झालेत? ही थोरल्या पवारांची खेळी असल्याचे प्रथमदर्शनी वाटत नाही. परंतु या प्रश्नाचे एका वाक्यात, एका शब्दात उत्तर शक्य नाही. जे काही झालंय त्यात बरीच गुंतागुत दिसते आहे. बरंच काही धूसर आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे चाणक्य आहेत, असा महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचा समज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काहीही झाले तर ते पवारांच्या खेळीशी जोडले जाते. काल अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अनेकजण नव्या सरकारमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आले त्यांना पवारांनीच पाठवले असावे, अशी अनेकांना शंका आहे. अजित पवार यांनी जे केले ते बंड आहे, असे पवार यांनी स्वत: कबूल केले तरी लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत.
अजित पवारांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे नेते पवारांच्या सोबत आहेत, म्हणून अजित पवारांचे बंड हा लुटूपुटूचा खेळ वाटत नाही. परंतु, तरीही लोक याला पवारांची खेळी समजतायत त्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते अजितदादांसोबत गेले आहेत.
काही दिवसांपूवी अजित पवारांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा. ‘प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेता हवा’, असे विधान करून भुजबळांनी त्यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न केला होता. ते भुजबळ अजितदादांसोबत शपथ घेऊन मोकळे झाले. अनेकांसाठी हा धक्का होता. शिवसेनेतून फुटल्यनंतर हिंदुत्ववादी नेते असलेल्या नथुराम भक्त भुजबळांना ओबीसींचा नेता बनवण्याचे श्रेय पवारांचेच. त्यांच्याच कृपेमुळे भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री- गृहमंत्री झाले. परंतु त्याही पेक्षा मोठा धक्का म्हणजे दिलीप वळसे पाटील दादांसोबत गेले. दिलीप वळसे पाटील हे एकेकाळी पवारांचे स्वीय सचिव होते. त्यांचे पवारांशी इतके गाढ संबंध आहेत की अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर तिथे वळसे यांची वर्णी लागली होती.
वसंतदादांच्या मंत्रिमंडळात पवार उद्योग मंत्री असताना ते एकदा दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील यांच्यासोबत भीमाशंकरला गेले होते. रात्री मुक्कामाच्या वेळी पवारांना अंगावर काही तरी सरपटत गेल्याचा भास झाला. ते खडबडून जागे झाले तेव्हा अंगावरून साप गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दत्तात्रय पाटलांना हाक मारली, झाला प्रकार सांगितला तेव्हा हा शुभशकून आहे, असे त्यांनी पवारांना सांगितले. पुढे आठ दिवसांत पवार मुख्यमंत्री झाले. हा किस्सा पवारांनीच दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीच्या सोहळ्यात सांगितला होता. पवारांचे वळसे पाटील यांच्या परीवाराशी किती गाढ संबंध आहेत, हे सांगणारा हा किस्सा आहे.
प्रफुल पटेल यांचे थोरल्या पवारांना सोडून जाणेही धक्कादायक आहे. यूपीएच्या पहील्या मंत्रिमंडळात पवारांच्या सोबत प्रफुल पटेल हेही मंत्री झाले होते. पटेल म्हणाले म्हणजे पवार म्हणाले, असे लोक कालपर्यंत मानत होते. ज्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शपथ घेतली त्याच रात्री प्रफुल पटेल मीडियाला सामोरे गेले. तुम्ही पवारांना दगा दिलाय का? असा सवाल जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा पटेल जे काही म्हणाले ते आश्चर्यकारक आहे. ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच आहोत, शरद पवार हेच आमचे नेते आहेत. काही दिवस जाऊ दे गोष्टी हळूहळू उलगडत जातील’. पटेलांच्या विधानात काही सस्पेन्स दडल्यासारखे वाटते आहे.
शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जी लाईन घेतली होती तीच ही लाईन आहे. त्यामुळे शिंदे आणि पटेल यांचे स्क्रीप्ट रायटर एकच आहेत का, असा संशय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. राजकारण हे कायम नागमोडी असते. तिथे काहीही घडू शकते. सुप्रिया सुळेही फार गडबडलेल्या किंवा तणावात दिसल्या नाहीत. ‘बऱ्याच गोष्टींची उकल व्हायची आहे. अजून १२ तासही उलटलेले नाहीत. अजित दादांसोबत किती आमदार गेलेत हे देखील स्पष्ट झालेले नाही’, असे त्यांनी सांगितले. ‘राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. आम्ही दोघे पुरेसे समंजस आहोत, या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात हे दोघांनाही ठाऊक आहे’, असेही त्या म्हणाल्या.
पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला थयथयाट पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत नाहीत. ‘आम्ही कायदेशीर लढाई लढणार नाही, जनतेत जाऊन लढाई लढू’, असे पवार म्हणाले असले तरी शपथ घेणाऱ्या आमदारांना अपात्र करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
हा सगळा घटनाक्रम पाहील्यानंतर अजित पवारांना थोरले पवार सामील असतील का, असा सवाल राजकीय पंडीतांच्या मनातही निर्माण झाला आहे. पवार जे करतात ते बोलत नाहीत. अनेकदा विषय झटकून टाकतात आणि पुढे कधी तरी खरे काय त्याबाबत गौप्यस्फोट करतात. त्यामुळे भविष्यात पवार असा एखादा गौप्यस्फोट करतील काय? असे अनेकांना वाटते आहे?
राज ठाकरे यांनी केलेला ट्वीट ही थिअरी मान्य करणारा आहे. ‘पवारांना उद्धव यांचे ओझे उतरवायचे होते, एक टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रवाना होईल’. झाल्याप्रकाराला थोरल्या पवारांची संमती होती, असे राज ठाकरे सुचवतायत. असे घडले असले, असे वाटत नाही. परंतु समजा झाल्याप्रकाराला पवारांची संमती असलीच तरी ती मनापासून नक्कीच नाही. जे घडलंय ते पवारांनी घडवून आणले असेल याची सुतराम शक्यता नाही. हे सगळं हात पिरगळून घडवून आणलेले आहे, असे फार फार तर म्हणता येईल. मोदी- शहा यांच्या निष्ठूर राजकारणाची ही झलक असू शकते. राजकारणाच्या सारीपाटावर आज एक्त एकच रिंगमास्टर दिसतो आहे. तो
दिल्लीत बसलाय.
हे ही वाचा:
सोलापूर जिल्हा ‘धार्मिक पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करणार, मंगलप्रभात लोढा!
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
भुजबळ, पटेल, मुश्रीफ सत्तेसोबत का गेले, हे समजणे फार कठीण नाही. गेलेल्यापैकी बऱ्याच लोकांनी पवारांसमोर हा पर्याय ठेवलेलाच होता की. परंतु राजीनामा नाट्य घडवून पवारांनी मामला काही काळ थंड केलेला होता. घरातली तरुण मुलगी पळून गेली, घरच्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह झाला. त्यानंतर आशीर्वाद देण्याच्या पलिकडे आई- वडीलांच्या हाती काय उरते? याच हतबलतेतून पवार झाल्या प्रकाराला माझी संमती होती, असे उद्या म्हणू शकतात. पवार हे काय रजनीकांत नाहीत, की काहीही झाले तरी परिस्थिती त्यांच्याच नियंत्रणात राहील. परीस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती हे सत्य आहे. परीस्थितीशी त्यांनी समझौता केला असण्याची शक्यता आहे.
भविष्यात ही खेळी होती, असे ते म्हणू शकतात. अनेक घडामोडी अशा असतात की ज्याची उकल ना वर्तमानात होत, ना भविष्यात. त्यामुळे अजित पवारांच्या बंडाची कारणमीमांसा लोकांच्या समोर येईलच हे ठामपणे सांगता येत नाही. लोक माझे सांगातीच्या तिसऱ्या भागात तरी पवार सत्य सांगतील अशी अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)