राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, अशा घटना इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नाही असे शरद पवार म्हणाले. या सर्व घडामोडीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते.
आजच्या अजित पवारांच्या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंड पडलेली पाहायला मिळाली. या शपथविधीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच गदारोळ पाहायला मिळाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ रविवारी घेतली. त्यांच्यासह इतर ८ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी नंतर शरद पवारांनी त्वरित पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर तसेच शरद पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर ते या पत्रकार परिषदेत म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान म्हणाले होते राष्ट्रवादी भ्रष्ट्राचारात बुडालेला पक्ष आहे. यावेळी त्यांनी इरिगेशन घोटाळ्याचा आणि शिखर बँकेचा उल्लेख केला. आणि त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले, त्यातून त्यांना मुक्त केले. मी मोदींचे आभार मानतो.”
“सहा तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले जाणार होते. संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने विचार करत होतो. त्यापूर्वीच पक्षापासून काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आणि आम्हीच पक्ष आहोत,” अशी भूमिका घेतली. ते पुढे म्हणाले. “माझं स्पष्ट मत आहे, आमदारांनी आणि नेत्यांनी घेतलेली भूमिकेसंदर्भात आणखी २ ते ३ दिवसांनी चित्र क्लिअर होईल. त्याचं कारण की ज्यांची नावं आली, त्यातल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क करुन आम्हाला निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, असं सांगितलं आहे. पण आमची भूमिका वेगळी आहे. ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही. पण त्यांनी माझ्याइतकंच जनतेच्या समोर त्यांची भूमिका मांडावी. त्यांनी मांडली नाही तर वेगळी भूमिका घेतली,” असं समजेन.
पक्ष सोडून विरोधकांच्या पक्षात जाऊन सत्ता स्थापन करणे हे काही माझासाठी नवीन नसल्याचे शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, “आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याबाबतचा- असा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. १९८६ साली निवडणुकीच्या नंतर मी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ पैकी ६ सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते. मी त्या ५८ चा विरोधी पक्षनेता होतो. पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. पक्षाची बांधणी करण्याचं ठरवलं. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा हीच संख्या ६९ वर गेली. जे मला त्यावेळी सोडून गेले त्यातून फक्त ३-४ जणांचा विजय झाला बाकी सगळे पराभूत झाल्याचे,” शरद पवारांनी सांगितले.
माझा महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. संयुक्त सरकार आम्ही स्थापन केलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येत आहेत. आजच्या स्थितीत सगळे सांगतायेत आमची तुम्हाला साथ आहे. ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा फोन आला. अनेक नेते आणि अनेक पक्षांनी मिळून पर्यायी नेतृत्व उभं करावं. सगळ्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. अर्थात उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हीच माझी निती असल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिंदेंप्रमाणे अजित पवार यांनी पक्षावर दावा केला तर आपली भूमिका काय असेल असे विचारले असता शरद पवार म्हणाले, “माझं काहीही म्हणणं नाही. कुणी कुणावरही दावा सांगू द्यात. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आम्हा लोकांच्या मतभेदातून, काही निर्णयातून झाली. पक्ष नसताना पक्ष आम्ही स्थापन केला. त्यामुळे कुणी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांच्यात जाऊन भूमिका मांडू. त्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा कसा मिळेल, याची काळजी घेऊ,” असे पवार म्हणाले. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेवर अजित पवार यांची भूमिका काय असेल ते पाहावं लागेल.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी; पुढील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार
प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पद जितेंद्र आव्हाडांकडे
‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचा दावा
शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, असं अजित पवार म्हणाले.