राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे.
“देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. पक्षाच्या वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. करोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
“विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही एकत्र आलो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ९ वर्ष सरकार सुरू आहे. देशाला मजबुतीने पुढे नेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असा प्रयत्न सुरू असताना पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाल्याचं,” स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
पक्ष आणि चिन्हावर दावा
“राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. पुढे देखील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार आहोत. नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेलेला आहे. काही जण आरोप करतील, साडे तीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआनं काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा:
ट्रिपल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार
“तिघे मिळून महाराष्ट्रात विकासाचा नवा अध्याय लिहू”
अजित पवारांनी अख्खी चुलचं फिरवली! राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”
विरोधकांना टोला
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे. विरोधी पक्ष एकत्र बैठका करत आहेत, कुठे ममतादीदी त्यांच्या राज्यात बैठका करत आहे, केजरीवाल त्यांच्या राज्यात काम करत आहे. जेव्हा यांची बैठक होते तेव्हा आऊटपूट काहीच निघत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.