जेईई परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या ५०० क्रमांकातील विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबई, दिल्ली आणि मद्रास आयआयटी कॉलेजांना पसंती दिली आहे. त्या तुलनेत कानपूर, खरगपूर, रूरकी, हैदराबाद या कॉलेजांना कमी पसंती मिळाली आहे.
पहिल्या ५०० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई आयआयटीला पसंती दिल्याने कॉलेजचे उपसंचालक एस. सुदर्शन यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘मुंबई आयआयटीला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याने आम्ही आनंदी आहोत. कॉलेजमधील पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. पुढच्या दोन वर्षांत आम्ही साडेतीन हजार खोल्या असणारी तीन नवी हॉस्टेल उभारणार आहोत. आमच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी आम्ही आमच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल करत आहोत. आयआयटी मुंबईतील अनेक विभागांची जगभरातील सर्वोत्तम विभागांत नोंद होते. आमच्या कॉलेजमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे पाहिले जात नाही तर त्यांनी जीवनातील अन्य कौशल्येही आत्मसात करावी, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो,’ असे ते म्हणाले.
‘भारतातील गुणवान विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांनी त्यांची सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी कॉलेज सदैव प्रयत्नशील असते. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यापासून ते योग्य मार्गदर्शन करण्यापर्यंत तसेच, सर्वोच्च शिक्षण देण्यापासून ते योग्य व्यासपीठ उपलब्ध करण्यापर्यंत सर्व काही त्यांना दिले जाते. येथे चार-ते पाच वर्षे केलेली मेहनत आपल्याला पुढील आयुष्यासाठी मोठी पुंजी ठरेल, याची विद्यार्थ्यांना पुरेपूर जाण आहे,’ अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी दिली.
अर्थात पहिल्या शंभरात आलेल्या एकाने आणि पहिल्या ५०० क्रमांकांत आलेल्या तिघांनी प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतली आहे. जॉइंट सीट अलोकेशन ऑथोरिटीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख दोन हजार विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षी नोंदणी केली आहे. त्यातील १.९ लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि शाखांची निवड केली आहे. त्यात एक लाख ६० हजार मुले आणि ५२ हजार १७० मुलींचा समावेश आहे. तर, तिघे तृतीयपंथीय आहेत. यंदाच्या वर्षी आयआयटी, एनआयटी, आआईएसटी शिबपूर, आयआयआयटी आणि अन्य अनुदानित अशा ११९ तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये ५७ हजार १५२ जागा आहेत. आयआयटी-खरगपूर येथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम असल्याने येथे सर्वाधिक जागा आहेत,’ असे जेईईचे ऑर्गनायझिंग चेअरमन प्राध्यापक बिष्णुपदा मंडल यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?
भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!
नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी
सर्वाधिक ५० लाख उमेदवारांनी कम्प्युटर सायन्सला पसंती दिली असून, त्यामागोमाग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेला ३५ लाख विद्यार्थ्यांनी पंसती दिली आहे. त्या पाठोपाठ मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी २२ लाख उमेदवारांनी पसंती दिली आहे. तर, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी १६ लाख उमेदवारांनी पसंती दिली आहे. गेल्या वर्षीपर्यंत या शाखेला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली होती. यंदा मात्र ही शाखा पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. सिव्हिल इंजिनीअरला १९ लाख जणांनी पसंती दिली आहे. तर, केमिकल इंजिनीअरिंगसाठी १० लाख उमेदवारांनी पसंती दिली आहे.