एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी गोळी मारल्यामुळे आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर फ्रान्समध्ये दंगली उसळल्या आहेत. जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या असून आतापर्यंत १०० लोकांना अटक करण्यात आली आहे. तब्बल १४ हजार पोलिस या दंगलींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. सलग तीन दिवस फ्रान्समध्ये हे तणावाचे वातावरण आहे.
मंगळवारी ही घटना घडली होती. फ्रान्समधील नान्तेरे येथे रहदारी नियंत्रित करत असताना नियमांचा भंग केला म्हणून एका पोलिसाने १७ वर्षीय तरुणाला गोळी मारली. त्यातून हा सगळा उद्वेग पसरला. त्या पोलिसाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आता कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
त्या तरुणाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये वातावरण तापले. अनेक ठिकाणी दंगली झाल्या आणि जाळपोळही झाली. पोलिस ठाण्यांवरही हल्ले झाले. पोलिसही त्यात जखमी झाले. फ्रान्सचे मंत्री दार्मानिन यांनी सांगितले की, या दंगलींच्या निमित्ताने १५० जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन आणि दार्मानिन यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ज्या तरुणाची हत्या झाली त्यासंदर्भातील चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
३६५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा ट्विस्ट आणि टर्न्सचा प्रवास कसा होता?
अतिक अहमदने बळकावलेल्या जमिनीवर बांधलेली घरे योगींनी केली सुपूर्द
कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स
८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?
या तणावग्रस्त परिस्थितीत अनेक ठिकाणी आंदोलक विविध ठिकाणांना आगी लावत आहेत. मध्य पॅरिसमध्ये एका नाईकी बुटांच्या दुकानाला आग लावण्यात आली. त्यात १४ लोकांना अटक करण्यात आली आहे तसेच आणखी १६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी या दुकानातील वस्तू चोरल्या होत्या. निदर्शकांनी गाड्यांनाही आगी लावल्या. आता मार्सेली, लायन, पाऊ, टुलौज, लिले येथेही अशा घटना घडत आहेत. उत्तर पॅरिसच्या उपनगरता एका बसला आग लावण्यात आली होती तर लायन शहरात एका ट्राम गाडीला आग लावली गेली.