एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होत असताना भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा ऐतिहासिक सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर आतापासूनच अहमदाबादमधील हॉटेलांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. काही हॉटेलांनी तर त्यांच्या दरात दहापट वाढ केली आहे.
पारपंरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतापासूनच आतूर झाले आहेत. त्यामुळे १५ ऑक्टोबरसाठी अहमदाबादमधील हॉटेलची रूम हवी असल्यास खिसा रिकामा करावा लागत आहे. विविध हॉटेल बुकिंगच्या वेबसाइटवर नजर टाकल्यास या हॉटेलच्या खोल्यांचे दर गगनाला भिडले असल्याचे दिसत आहे. काही लग्झरी हॉटेलच्या रूमची किंमत ५० हजारांपासून ते एक लाखापर्यंत पोहोचली आहे. एरवी या लग्झरी हॉटेलातील रूमच्या किमती पाच हजार ते आठ हजार रुपये असतात.
हे ही वाचा:
अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद
३६५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा ट्विस्ट आणि टर्न्सचा प्रवास कसा होता?
चालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?
अहमदाबादमध्ये विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने रंगणार आहेत. अंतिम सामनाही येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच रंगेल. त्यामुळे अहमदाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी कालावधीत मोठे क्रिकेट सामने शहरात होणार आहेत.
शहरात पाहुण्यांसाठी सुमारे १० हजार खोल्या आहेत. परंतु भारत-पाक सामना पाहण्यासाठी सुमारे ४० हजार क्रिकेटप्रेमी हजर राहण्याची शक्यता आहे. या मागणीमुळे १५ ऑक्टोबर रोजी लग्झरी हॉटेलमध्ये एकही रूम शिल्लक राहिलेली नाही. मात्र ही दरवाढ लग्झरी हॉटेलांपर्यंतच सीमित आहे. ते मोठ्या कार्यक्रमासाठी काही रूम राखीव ठेवत असल्याने ही दरवाढ त्यांच्यापुरतीच सीमित आहे, असे स्पष्टीकरण गुजरात हॉटेल अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांनी दिले आहे.