मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला आज ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ३० जून रोजी सरकार स्थापन झालं असलं तरी राजकारणातील उलथापालथ ही १० दिवस आधीच सुरू झाली होती.
सरकार स्थापनेपूर्वी केवळ महाराष्ट्रानेच नाही तर साऱ्या देशाने राजकीय नाट्य, थरार अनुभवला. एखादा सिनेमा जसा रंगत जाऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतो अगदी त्याप्रमाणेच या राजकीय नाट्याने साऱ्या देशाला पुढे काय होणार? या प्रश्नावर खिळवून ठेवलं होतं.
या नाट्याच्या अंकाला सुरुवात झाली ती २० जून रोजी. २० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्व पक्षांचे फासे पलटले. त्याच रात्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले आणि एकच खळबळ उडाली. पुढे या आमदारांनी थेट गुवाहाटी गाठलं. आमदारांची संख्या वाढत ४० शिवसेनेचे आणि १० इतर आमदार अशी तब्बल ५० आमदार संख्या झाली. २९ जून रोजी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार गुवाहाटीवरून गोव्याकडे गेले. त्यानंतर ३० जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचे बहुमत गेले आणि उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. उद्धव ठाकेरेंनी राजीनामा दिल्याने बहुमत चाचणी झाली नाही. दुसरीकडे राजभवनावर शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या राजकीय नाट्यातील मोठा ट्विस्ट जनतेसमोर आणला. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. शिवाय स्वतः सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा धक्का पचवतो न पचवतो तोपर्यंत दिल्लीतील हालचालींमुळे पुढच्या तासाभरातच देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.
हे ही वाचा:
चालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?
मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवाय आपलीच शिवसेना खरी असल्याचाही त्यांनी दावा केला होता. पुढे शिवसेना पक्षासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात न्यायालयीन लढाई झाली, निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाला. वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत.