नवी दिल्ली गेल्या काही वर्षांत तिथे घडणाऱ्या क्रूर गुन्ह्यांमुळे चर्चिले जात आहे. मात्र १८६२ ते १९५६ या वर्षांतील नोंद गुन्ह्यांकडे पाहिल्यास दिल्लीतील लोकांचे जीवन कसे साधे सरळ होते, हे आढळून येईल.
२ जून १८७६चा दिवस. मोहम्मद खान हे झोपण्याची तयारी करत असताना, शेरा, कालू खान आणि मोहम्मद या तीन व्यक्तींनी त्यांच्याकडे रात्रीपुरता आसरा मागितला. खान यांनी त्यांच्या खोलीत आसरा देऊन झोपण्यासाठी गाद्याही दिल्या. मात्र सकाळी उठल्यावर पाहतात तर काय, ते तिघेही गाद्यांसकट गायब झाले होते. दिल्ली पोलिसांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारी, १८७६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या तीन आरोपींना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दिल्ली पोलिस आतापर्यंत दाखल गुन्ह्यांचे डिजिटायझेशन करत आहेत. त्यातील ‘अँटिक’ २९ गुन्ह्यांपैकी या एका गुन्ह्याची नोंद करता येईल. यात संत्री, चादरी, ब्लँकेट, चप्पला, बकऱ्या, गाढवे आणि बैलांचीही चोरी झाल्याच्या घटना आहेत. ‘तेव्हा हत्येचे गुन्हे दुर्मिळ होते. तेव्हा संत्री किंवा पाजयमा अशा सामान्य वस्तूंच्या चोरीच्या घटना होत,’ असे साहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह कलकल यांनी सांगितले. या सर्व दाखल गुन्ह्यांचे डिजिटायझेशन सुरू असून आता घरबसल्या लोकांना या जुन्या गुन्ह्यांची माहिती घेता येणार आहे.
१९व्या शतकातील दिल्लीचे गुन्हे १८९७ : सिगारेट, मद्यचोरीप्रकरणी १० रुपयांचे बक्षीस
इम्पिरिअल हॉटेलचा एक कुक सब्जी मंडी पोलिस ठाण्यात आला होता. त्याच्या हातात एक इंग्रजी पत्र होते. त्यात हॉटेलच्या एका खोलीतून सिगारेटचे अर्धे पाकीट आणि मद्याच्या एक बाटलीची चोरी झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील चोराला पकडून देणाऱ्याला १० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र चोर काही सापडला नाही.
हे ही वाचा:
केदारनाथमध्ये खेचरांनी हेलिकॉप्टरपेक्षा २६ कोटी अधिक कमावले!
कॅनडातून अमेरिकेत ८०० पेक्षा अधिक भारतीयांना घुसवले; भारतीयाला झाली शिक्षा
चुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते
रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास मनाई
१८६२ : थोबाडीत दिल्याने काम होत असेल तर बंदूक कशाला पाहिजे?
साराबीन नावाची एक व्यक्ती मेहरौली पोलिस ठाण्यात आली. भोला, नानवा, मोहन आणि आसरान या चौघांनी त्याच्या ११० बकऱ्या चोरल्याचा साराबीन याचा आरोप होता. तो गुरगाव येथे त्याच्या बकऱ्यांसाठी पाणी आणायला जात असताना या चौघांनी त्याला थोबाडीत मारून त्याच्या बकऱ्यांची चोरी केली होती, असे साराबीनचे म्हणणे होते.
१८९५ : जेव्हा लोक कबुतरांसह पळून जातात
राम चंदर यांनी नांगलोई पोलिस ठाण्यात त्यांच्या घरातून १०४ कबुतरांची चोरी झाल्याची तक्रार केली. या प्रकरणी त्यांनी दोघांवर आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या घरातील नोकर कुतबुद्दीन याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याला त्याच्या घराची सर्व माहिती असल्याचा त्यांचा दावा होता.
१८९१ : ११ संत्र्यांसाठी एक महिन्याचा तुरुंगवास
रामबक्ष याने त्याच्या मित्रांच्या मदतीने राम प्रसादच्या ११ संत्र्यांची चोरी केली होती. रामप्रसादने त्याची ही चोरी रंगेहात पकडली होती आणि त्याला सब्जी मंडी पोलिस ठाण्यात आणले होते. या चोरीप्रकरणी रामबक्ष याला एक महिना तुरुंगवास भोगावा लागला होता.
१८९९ : झाड चोरल्याने पाच रुपये दंड
एका व्यक्तीने एक रुपया किमतीचे एक झाड रस्त्यावरून हटवून शेतात लावले होते. या प्रकरणी दिल्लीच्या अलिपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
१९०५ : लग्नावरून फसवणूक
शिवाने फतेह याला २० रुपये देऊन त्याच्यासाठी बायको शोधण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फतेह हा रूपराम याला घेऊन शिवाकडे आला. त्याने शिवासाठी १६ वर्षांची एक मुलगी बघितली असल्याचे सांगितले. मात्र लग्नाच्या दिवशी शिवाच्या लक्षात आले की, फतेह आणि त्याच्या मित्राने थोराड नववधू आणली आहे. त्यानंतर ती महिला पळून गेली तर, शिवाने पोलिस ठाण्यात तक्रार केली.
१९४७ : धान्यविक्रीवरून अटक
प्यारेलाल आणि सदाअली हे गस्तीसाठी बाहेर पडले होते. तेव्हा रॉबिन चित्रपटगृहाच्या परिसरात त्यांना गोविंदराम हा भाजीबाजारात जात असताना दिसला. त्याने त्याच्या गाडीकडे पाहिले असता, त्यात त्यांना तीन पोती धान्य आढळले. तेव्हा अन्नधान्याची टंचाई असल्याने धान्यांची विक्री करणे बेकायदा समजले जायचे.