सन २०१९मध्ये तबरेझ अन्सारी याची ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी झारखंडच्या सरायकेला-खरस्वान जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी १० जणांना दोषी ठरवले आहे. त्यांना ५ जुलै रोजी शिक्षा ठोठावली जाईल.
झारखंडच्या सरायकेला-खरस्वान जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी सन २०१९च्या तबरेझ अन्सारी हत्या प्रकरणात १० जणांना दोषी ठरवले असून ५ जुलै रोजी शिक्षेची घोषणा केली जाईल, असे सरकारी वकील अशोक कुमार राय यांनी सांगितले. कुशल महाली या आरोपींपैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता, अशी माहिती राय यांनी दिली. तर, पुराव्यांअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हे ही वाचा:
नितीन गडकरींच्या कामगिरीमुळे भारताने चीनला टाकले मागे
भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक
मालाडमध्ये झाड पडून एकाचा मृत्यू, विक्रोळीत भिंत कोसळली
मुंबईतील दोन सागरी सेतूंना सावरकर, अटलजींचे नाव
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमित शेखर यांनी भीमसिंग मुंडा, कमल महातो, मदन नायक, अतुल महाली, सुनामो प्रधान, विक्रम मंडल, चमू नायक, प्रेमचंद महाली, महेश महाली या आरोपींना दोषी ठरवल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. तर, मुख्य आरोपी प्रकाश मंडल उर्फ पप्पू मंडल हा आधीच न्यायालयीन कोठडीत आहे.
१७ जून २०१९ रोजी सरायकेला पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या धाटकीडीह गावात मोटारसायकलच्या चोरीच्या आरोपावरून अन्सारी याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. पुण्यात मजूर आणि वेल्डर म्हणून काम करणारा अन्सारी ईद साजरी करण्यासाठी घरी आला असताना त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. त्यावरूनच त्याला मारहाण करण्यात आली होती.