मुंबई महापालिकेमधील कथित कोविड घोटाळयाप्रकरणी ईडीने सखोल तपास सुरू केला असून लाईफलाईन कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईडीने याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात छापेमारी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं.
मोठ्या संख्येने खोटे डॉक्टर्स आणि रुग्ण कोविड सेंटरमध्ये लाईफलाईन कंपनीकडून दाखवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने कागदोपत्री दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नाहीत, असं ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती आहे. ईडी याप्रकरणी आणखी चौकशी करत आहेत.
महापालिकेतील विविध अधिकारी आणि मोठ्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्ती या प्रकरणात ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे. महापालिकेचे जंबो कोविड केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. तसेच या कथित कोविड घोटाळ्यात काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. ईडीकडून सध्या या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!
हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांची परीक्षा पाहायची का? ‘आदिपुरुष’वरून न्यायालयाने झापले
‘आम्ही सलमान खानला ठार मारूच’ गँगस्टर गोल्डी ब्रार याची दर्पोक्ती
निधी सिंगची जागतिक विद्यापीठ गेम्ससाठी निवड
कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. त्यावेळी दहिसर येथे एक कोविड सेंटर उभं करण्यात आलं होतं. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं आणि त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं. मात्र, यात घोटाळा असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि या प्रकरणाचा पाठपुरावा देखील केला होता.