इजिप्तच्या दौऱ्यावर गेलेले ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांनी इजिप्तचे पंतप्रधान ‘मोस्तफा मादबौली’ आणि अन्य मंत्र्यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्यासोबत व्यापारी संबंध आणि धोरणात्मक भागिदारीवर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्यावहिल्या इजिप्तच्या दौऱ्याला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसीच्या निमंत्रणानंतर ही भेट झाली. भारतीय पंतप्रधानांनी गेल्या २६ वर्षांत इजिप्तला दिलेली ही ‘पहिलीच द्विपक्षीय भेट’ आहे.
पंतप्रधान मोदींनी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम अल्लम यांचीही भेट घेतली आणि येथे स्थलांतरित झालेल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधला. पंतप्रधानांनी तेथील बोहरा मुस्लिम समुदायाच्या सदस्यांचीही भेट घेतली. भारताच्या दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने नूतनीकरण केल्या जात असलेल्या कैरो येथील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीच्या आगामी भेटीपूर्वी ही बैठक झाली.फातिमा घराण्यातील बोहरा समुदाय सन १९७० पासून मशिदीच्या नूतनीकरणात सक्रियपणे सहभागी आहे.
पंतप्रधान मोदींचे विमानतळावर आगमन होताच इजिप्तच्या पंतप्रधानांनी त्यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना मानवंदना देण्यात आली. इजिप्तसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ‘मला विश्वास आहे. या भेटीमुळे भारताचे इजिप्तसोबतचे संबंध दृढ होतील. मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक आहे,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.
हे ही वाचा:
सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन
मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…
पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय
सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार
राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांनी भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्र्यांचा गट स्थापन केला आहे. याच ‘भारत युनिट’सोबत पंतप्रधानांची पहिली बैठक झाली. परराष्ट्र मंत्रालयाने या चर्चेतील फलनिष्पतीबाबत कौतुक केले. भारताकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ते समाधानी असून विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
दोन्ही देशांमधील शिष्टमंडळात व्यापार आणि गुंतवणूक, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, आयटी, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म, फार्मास्युटिकल्स आणि एकमेकांमधील सहकार्य मजबूत करणे आदी विषयांवर चर्चा झाली. इजिप्तचे परराष्ट्र व्यवहार मंत्री समेह शौकरी, अर्थमंत्री मोहम्मद माईत आणि उद्योग आणि व्यापार मंत्री अहमद समीर यांचा या बैठकीतील सात सदस्यांमध्ये समावेश होता.
रविवारी पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, कैरो येथील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये, पारंपरिक पोशाख परिधान केलेले भारतातून स्थलांतरित झालेले नागरिक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले होते. मोदी यांच्या आगमनानंतर त्यांनी भारतीय तिरंगा फडकावला आणि ‘मोदी, मोदी’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या.पंतप्रधान मोदी हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीला भेट देऊन पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना आदरांजली वाहतील.