भाजपाला केंद्रात टक्कर द्यायची या उद्देशाने बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपा विरोधातील १५ पक्ष एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी आरजेडी, काँग्रेस, जेडीयू, टीएमसी, आम आदमी पार्टीसह इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातून शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या या बैठकीची धुरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. या बैठकीला देशभरातले बडे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय महासचिव डी राजा आणि दीपांकर भट्टाचार्य बैठकीला उपस्थित असणार आहेत.
हे ही वाचा:
टायटॅनिकच्या जवळ सापडले दोन अवशेष; ते टायटनचे आहेत का याचा शोध
लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित
पाटण्यात पुन्हा मोदीविरोधाचे महागठबंधन
‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
दरम्यान, विरोधकांना बैठकीपूर्वी धक्का बसला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) प्रमुख जीतन राम मांझी यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जीतन राम मांझी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय सांगितला.