पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस तयार केली हे वाक्य उद्धव ठाकरेंना चांगलंच झोंबलं. पण मी पुन्हा म्हणतो की, मोदींनीच कोरोनाची लस तयार केली. कारण कोरोनाची लस जगातील केवळ पाच देश करू शकले. कारण मोदींचे जागतिक स्तरावर विविध देशांशी संबंध असल्यामुळे भारताला त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मिळाला, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. एकूणच लशीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरूच असल्याचे दिसले.
सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पूर्ण केलेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने भाजपाने महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांना फडणवीस संबोधित करत होते.
फडणवीस म्हणाले की, देशातील शास्त्रज्ञ जेव्हा कोरोनावर लस तयार करत होते तेव्हा त्यांना लसनिर्मितीसाठी सहाय्य कसे करता येईल, यासाठी पंतप्रधानांनी या शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यांना १८०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि अल्पावधीत ही लसनिर्मिती होऊ शकली. त्यानंतर १४० कोटी जनतेला लस देण्यात आली. महाराष्ट्रात साडे सतरा कोटी मोफत लसींचे वितरण करण्यात आले.
वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी याच लशीच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शरसंधान केले होते. त्याआधी फडणवीसांनी एका कार्यक्रमात मोदींनी लस तयार केली असे विधान केले होते. त्याचा व्हीडिओ उद्धव ठाकरे यांनी त्या सभेत ऐकवून दाखवला. मोदींनी लस तयार केली तर शास्त्रज्ञ काय करत होते, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी हे उत्तर दिले.
हे ही वाचा:
ईडीची कारवाई, कही पे निगाहे कही पे निशाना ?
दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट
आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!
मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’
फडणवीस म्हणाले की, कोरोनाची लस जर दिली गेली नसती तर आपण इथे नसतो. काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाही. आज आपण कदाचित अमेरिका, रशियाकडे लशीसाठी हात पसरले असते. त्यांनीही आपल्याला कदाचित लशी दिल्या नसत्या. आमच्या लोकांना आम्ही देऊ मग तुम्हाला पुरवू असे म्हटले असते. आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता. पण या देशाला दूरदर्शी पंतप्रधान मिळाले म्हणून हे अघटित घडले नाही.
अमित शहा पुरेसे आहेत!
फडणवीस यांनी मणिपूरचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का जात नाहीत असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, मणिपूरचा प्रश्न हाताळण्यासाठी अमित शहाच पुरेसे आहेत. तिथे नरेंद्र मोदी यांना जाण्याची आवश्यकताही वाटणार नाही.